मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाश्यांचा हल्ला; माजी उपसरपंचाचा मृत्यू

वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथे डोंगरावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघांवर मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. ६ मे) सकाळी घडली. हनुमंत बबूशा कोयते (४४) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून हनुमंत कोयते हे नवलाख उंबरे गावचे माजी उपसरपंच होते.
दत्ता कडलक, लक्ष्मण कदम, एकनाथ धायबर (सर्व रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) अशी जखमींची नावे आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलाख उंबरे येथील डोंगरावर दररोज स्थानिक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी जातात. मंगळवारी सकाळी हनुमंत कोयते, दत्ता कडलक, लक्ष्मण कदम, एकनाथ धायबर हे चौघेजण मॉर्निंग वॉकसाठी गेले होते.
डोंगर चढत असताना डोंगरामधील तामकडा येथे अचानक चौघांवर मधमाश्यांनी हल्ला केला. मधमाश्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हनुमंत कोयते यांचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हनुमंत कोयते यांच्या निधनावर शोक व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्ती, आणि दोन मुले असा परिवार आहे.





