नेवासा : मुलीला पाहण्यासाठी पाहुणे येणार असल्याने घरात आनंदाचे वातावरण असतानाच दुर्दैवी अपघाताने सुप्रिया आदिनाथ पवार (१९) हिचा मृत्यू झाला. भानसहिवरे गावात मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञात वाहनाने तिला धडक दिली. या घटनेने गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. शुक्रवार (दि. ३) रोजी सकाळी साडेसहा वाजता नेवासा-शेवगांव राज्य महामार्गावर ही दुर्घटना घडली. इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या सुप्रियाच्या घरात तिला पाहण्यासाठी प्रथमच पाहुणे येणार होते. आई-वडील व तीन भाऊ सकाळपासून घर सजवण्यात व्यस्त होते. कधीच मॉर्निंग वॉक न करणारी सुप्रिया आज मात्र शेवगांवकडे चालत घरी परतत असताना हॉटेल जयराजजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने तिला जोरदार धडक दिली. अपघातानंतर ती रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडली. स्थानिकांनी तिला नेवासा फाट्याजवळील खासगी रुग्णालयात नेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि सर्वत्र शोककळा पसरली. दुपारी अंत्यसंस्कार झाले. वाहनचालक फरार असून, नेवासा पोलिस तपास करत आहेत. या दुखद घटनेने पवार कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.