बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची चारचाकी जप्त; नेमकं प्रकार काय? घ्या जाणून

बीड : जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शेतकऱ्यांच्या तलावात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न दिल्याने माजलगाव न्यायालयाने थेट बीडच्या जिल्हाधिका-यांचे वाहन जप्त करून घेतले आहे. वाहन जप्त केल्याने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठी नामुष्की ओढवली असून या निर्णयाने खळबळ उडाली आहे.
वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शेतकरी शिवाजी टोगे, संतोष टोगे व बाबू मुंडे या शेतकऱ्यांची जमीन लघु सिंचन तलावासाठी शासनाने संपादित केली होती. या जमिनीचा अत्यंत तुटपुंजा मोबदला त्यांना देण्यात आला होता. त्यामुळे या शेतकऱ्यांनी माजलगाव येथील सत्र न्यायालयात धाव घेत यासाठी दावा दाखल केला होता. या दाव्यावर कोर्टाने संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे अंशत: मान्य करून २९ ऑक्टोबर २०१५ रोजी या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा, असा निकाल दिला होता.
मात्र, शासनाने काही प्रमाणात रक्कम देऊन संपूर्ण रक्कम देण्यास चालढकल केली. त्यामुळे सह. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बुधवंत यांनी व्याज लावून सदर रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दहा दिवसांपूर्वी पारित केले होते. न्यायालयाने वादी यांचे वकील यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी यांना मावेजा बाबत सोमवारी जाऊन आपली बाजू मांडली व रक्कम अदा करण्यास सांगितले.
मात्र, जिल्हाधिकारी यांनी पैशाची पूर्तता करू शकत नाही. तुम्ही गाडी घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर कोर्टाच्या बेलीपने जिल्हाधिकारी यांचे वाहन (क्रमांक एम एच २३ बीसी २४०१) कायदेशीर बाबीची पूर्तता करून जप्त केली. याप्रकरणी वादी शिवाजी टोगे, संतोष टोगे व बाबू मुंडे यांच्या वतीने अॅड. बाबुराव तिडके, एस.एस.मुंडे यांनी बाजू मांडली.





