Bribe News : मोठी खळबळ! बड्या अधिकाऱ्याला 45 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक
Bribe News : बीडमध्ये ACBची धडाकेबाज कारवाई; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांना 45 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक.

Bribe News : राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवायांचा धडाका सुरू असतानाच बीडमध्ये शुक्रवारी मोठी खळबळ उडवणारी कारवाई करण्यात आली.
उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर काही तासांतच विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांना त्यांच्या राहत्या घरी 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना ACBच्या पथकाने रंगेहात पकडले.
सुनेत्रा पवार या दोन दिवसीय बीड दौऱ्यावर असून त्यांनी आज जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. जिल्हा विकासाच्या विविध विषयांवर त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. विशेष म्हणजे, या बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यावरच नंतर लाचखोरीचा सापळा रचण्यात आल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बैठक संपल्यानंतर श्रीनिवास लखमावाड हे त्यांच्या निवासस्थानी परतले. याच ठिकाणी त्यांनी 45 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. पूर्वनियोजित सापळा रचत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना लाच स्वीकारतानाच ताब्यात घेतले. कारवाईनंतर त्यांच्या विरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, भ्रष्टाचाराविरोधात प्रशासनाकडून कठोर भूमिका घेतल्याचा संदेश या कारवाईतून गेल्याचे बोलले जात आहे. ACBकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, लाच व्यवहाराशी संबंधित इतर बाबींचीही चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही महिन्यांत ACBच्या कारवायांत वाढ झाली आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कारवाईत महापालिकेतील सुपरवायझरला 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता बीडमधील 45 लाखांच्या कथित लाच प्रकरणामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यभर चर्चा रंगली आहे.





