पिंपोडे बुद्रुक येथे भीषण आगीत दुकान बेचिराख

वाठार स्टेशन – पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील बसस्थानक परिसरातील कृषी सेवा केंद्राच्या दुकानाला बुधवारी पहाटे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान बेचिराख होऊन 30 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही.
याबाबत माहिती अशी, पिंपोडे बुद्रुक येथील मुख्य बाजारपेठेत बसस्थानक आहे. या परिसरात दत्तात्रय काशिनाथ महाजन यांच्या इमारतीत एका बॅंकेचे एटीएम मशीन आणि कोरेगावचे व्यापारी अनिल ढोले यांचे ऍग्रो हायटेक हे खते, बी-बियाणे आणि शेतीविषयक औषधांचे दुकान भाडेतत्त्वावर आहे. पिंपोडे बुद्रुक येथील नेताजी पाटील हे या दुकानाचे कामकाज पाहतात. या दुकानाला बुधवारी पहाटे 4 ते 5 या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे परिसरात आगीचे लोळ आणि धूर पसरला होता. या दुकानाच्या शेजारी असलेल्या एटीएममधून पैसे काढायला आलेल्या ग्राहकाला आणि पहाटे फिरायला येणाऱ्या लोकांना दुकानाला लागलेली आग दिसली. याची माहिती मिळाल्यावर लोकांची गर्दी झाली. शेजारील इमारतीतील लोकाना जागे करुन आणि आग लागलेल्या दुकानाच्या वर राहणाऱ्या दतात्रय महाजन आणि त्यांच्या पत्नीला लोकांनी सुखरूप बाहेर काढले. तोपर्यंत आग अधिक पसरल्याने, ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे धाडस कोणालाही होत नव्हते.
मात्र, माजी सरपंच जनार्दन निकम, संतोष लेंभे यांनी स्वतःचे पाण्याचे टॅंकर आणून ग्रामस्थ आणि युवकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. काही लोकांनी महावितरणचे वायरमन रोहन पवार यांना फोनवरून संपर्क साधला. त्यांनी तत्परतेने परिसरातील विद्युतपुरवठा खंडित केल्याने मोठा अनर्थ टळला. तत्पूर्वी, किसनवीर कारखाना, वाई नगरपरिषद व अन्य ठिकाणचे अग्निशमन बंब बोलावण्यात आले. मात्र, ते वेळेत पोहोचले नाहीत. तोपर्यंत संपूर्ण दुकान जळून बेचिराख झाले होते. या आगीत बी-बियाणे, रासायनिक खते, शेती विषयक औषधे, फर्निचर, संगणक आणि व्यवसायाची कागदपत्रे भस्मसात झाली. ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे शेजारची दुकाने आणि घरे आगीपासून वाचली. वाईवरुन आलेल्या अग्निशमन दलाच्या बंबाने उर्वरित आग विझवण्यात आली. वाठार स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.





