“सटरफटर लोकांमुळे…’; सुषमा अंधारेंबाबतचा प्रश्न, नीलम गोऱ्हे यांचा सणसणीत टोला

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमरदारांसह बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटातून गळती सुरुच झाली. त्यानंतर आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे या देखील आता मुख्यमंत्री शिंदेच्या गटात सामील झाल्या आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.
विधानभवनात शिवसेना पक्ष कार्यालयात हा प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ‘नीलम गोऱ्हे यांचा प्रवेश ऐतिहासिक आहे..’ असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याचा मी निर्णय घेतला आहे. शिवसेनेत मी चांगलं काम केलं आहे. पण आता राष्ट्रीय भूमिका आणि राज्यातले प्रश्न यासाठी शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय मी घेतला आहे.”
दरम्यान, सुषमा अंधारे आल्यामुळे ठाकरे गटातील महिला नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा आहेत. आधी मनिषा कायंदे आणि त्यानंतर आता तुम्ही पक्षाची साथ सोडली, त्यामागे हेच कारण तर नाही? असं विचारल्यावर ‘सटरफटर लोकांमुळे नाराज होण्याची परिस्थिती नाही…’ असं म्हणत नीलम गोऱ्हेंनी सुषमा अंधारेंना टोला लगावला आहे.
कोण आहेत निलम गोऱ्हे?
नीलम गोऱ्हे यांनी 1987 पासून सामाजिक कार्यास सुरुवात केली. सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांनी काही काळ सामाजिक चळवळीत काम केल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला.
गेल्या अनेक वर्षांपासून त्या विधान परिषदेवर शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात. आतापर्यंत तीन वेळा त्या विधानपरिषदेवर निवडून आल्या आहेत. 2005 मध्ये त्या शिवसेना उपनेत्या होत्या. 2007 मध्ये त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या झाल्या, 2010 मध्ये त्यांनी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणूनही काम केले आहे.





