आईच्या काळजीपोटी ‘तो’ पळाला कारागृहातून अन्…

पुणे – येरवडा खुल्या कारागृहातून आरोपीने पलायन केले होते. आईला हृदयविकाराचा झटका आल्याने काळजीपोटी त्याने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, या कैद्याला त्याच्या आई-वडिलांनीच बुधवारी (दि.22) सकाळी कारागृहात हजर केले. आशिष भरत जाधव असे त्याचे नाव आहे. तो जन्मठेपची शिक्षा भोगत आहे.
आशिष याने सोमवारी (दि.20) कारागृहातून पलायन केले होते. वारजे माळवाडी परिसरातील खुनाच्या गुन्ह्यात आशिषला 2015 मध्ये जन्मठेप सुनावण्यात आली होती. तेव्हापासून तो शिक्षा भोगत होता. वर्तवणूक चांगली वाटल्याने त्याची रवानगी 16 ऑगस्ट 2022 पासून खुल्या कारागृहात केली आहे. त्याला कारागृहातील अन्नधान्य विभागात काम देण्यात आले होते. दरम्यान, त्याच्या शोधासाठी येरवडा पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता.
त्यावेळी आशिषच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. जाधव याने आईच्या काळजीपोटी कारागृहातून पलायन केले होते. सकाळी 7.30 च्या सुमारास आशिषच्या आई-वडिलांनी त्याला कारागृहात हजर केले. आशिषने येरवडा मध्यवर्ती कारागृहातून नाही, तर खुल्या कारागृहातून पलायन केले. येरवडा खुले जिल्हा कारागृह ही किमान सुरक्षा असलेली संस्था आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृह आणि येरवडा खुले जिल्हा कारागृह हे वेगवेगळ्या शासकीय संस्था आहेत, असे पोलिसांनी सांगितले.





