Pimpri Crime : पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि तिचा प्रियकर गजाआड ; खळबळजनक प्रकरणातील दोन्ही आरोपी येरवड्यात

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – चिंचवड येथील नकुल भोईर यांच्या खूनप्रकरणात दोन्ही संशयितांना रविवारी (दि. २) न्यायालयीन कोठीत सुनावली. यामुळे त्या दोघांचीही येरवडा तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे.चैताली नकुल भोईर (वय २८, रा. माणिक काॅलनी, चिंचवड) आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (वय २१, रा. लिंकरोड, चिंचवड), अशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
नकुल आनंदा भोईर (वय ४०, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांचा खून त्यांची पत्नी चैताली हिने आपण एकटीने केल्याची माहिती तिनेच पोलिसांना फोन करून दिली. चिंचवड येथील माणिक काॅलनीतील महापालिकेच्या आरोग्य केंद्राजवळ २४ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेतीनच्या सुमारास खुनाची ही घटना घडली. चैताली हिने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिला २४ ऑक्टोबर रोजी अटक केली. मात्र या प्रकरणात आणखी कोणीतरी सहभागी असावे, अशी शंका पोलिसांना होती.
त्यानुसार पोलिसांनी तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र त्या दोघांनीही पोलिसांना काहीच माहिती दिली नाही. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्याची उकल केली. या प्रकरणात सिद्धार्थ याचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला २९ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्यानंतर चैताली आणि सिद्धार्थ पवार यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांनाही १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे त्या दोघांनाही रविवारी न्यायालयात हजर केले असता त्या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.





