नवी दिल्ली – केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या पोलिस थिंक टँकने सोशल मीडिया मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवर होणार्या विविध घोटाळ्यांविरूद्ध नागरीकांना सावध करणारा इशारा जारी केला आहे
ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ने अशा फसवणुकीचे सात प्रकार ओळखले आहेत ज्यात मिस्ड कॉल, व्हिडिओ कॉल, नोकरीच्या ऑफर, गुंतवणूक योजनांच्या नावाखाली फसवणूक, तोतयागिरी, अपहरण आणि स्क्रीन शेअर यांचा फसवणूकींच्या प्रकारांचा समावेश आहे.
लोकांना सध्या व्हॉट्सॲपवरून व्हिडीओ कॉल येतात. त्यात सेक्सशी संबंधीत व्हीडीओ असतात. त्यात सेक्ससाठीही ऑफर दिली जाते आणि त्याचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे असे धमकाऊन संबंधीतांकडून पैसे वसुल केले जात आहेत आणि अलिकडच्या काळात हे प्रकार कमालीचे वाढले आहेत असे यात म्हटले आहे. त्यापासून सावध राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे
व्हॉट्सअॅपने अलीकडच्या काळात अनेक सार्वजनिक संदेश मोहिमा सुरू करून ग्राहकांना जागरूक करण्याचाही प्रयत्न केला आहे. पण अजून त्या गैरप्रकारांना आळा घालण्याचा कोणताही प्रभावी मार्ग सापडलेला नाही. त्यामुळे लोकांनीच सावधगिरी बाळगून अनोळखी कॉल न घेण्याची सूचना केली आहे.
व्हिएतनाम, केनिया, इथिओपिया आणि मलेशिया या देशांच्या कोडपासून सुरू होणार्या क्रमांकांवरून आलेल्या मिस्ड कॉलद्वारे, ही फसवणूक मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
फसवणूक करणारे त्यांचे सोशल मीडिया हँडल सर्फ करून लोकांची वैयक्तिक माहिती मिळवतात आणि तत्सम प्रोफाइल तयार करतात व त्यातून फसवणूक केली जाते. काही वेळा हॅकर्स आपण उच्चपदस्थ अधिकारी आहोत असे सांगूनही फसवणुकीचा मार्ग अवलंबत असतात. व्हॉट्सअॅपने नुकत्याच जारी केलेल्या ‘स्क्रीन शेअर’ या सेवेवरूनही फसवणुकीचे नवीन मार्ग सध्या अवलंबले जात आहेत त्या बाबतही लोकांनी जागरूकता बाळगली पाहिजे असे आवाहन गृहमंत्रालयाच्या या थिंक टँकने केले आहे.