Team India Reaction : ‘मला जास्तच स्मार्ट बनवलंय…!’; ८० च्या दशकातील स्वतःचा विंटेज लूक पाहून १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी थक्क, पाहा VIDEO
Team India Reaction : बीसीसीआय टीम इंडियाच्या खेळाडूंचा ऐंशीच्या दशकातील लूकचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Team India Players React To 80s Look Viral Photos BCCI Video Vaibhav Sooryavanshi : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला १३ सप्टेंबरपासून सुरुवात होत असून, तिन्ही सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी बीसीसीआयने ‘एक्स’वर भारतीय खेळाडूंचा एक अत्यंत रंजक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सध्या धुमाकूळ घालणाऱ्या ‘८०s रेट्रो ट्रेंड’मधील स्वतःचे फोटो पाहून भारतीय खेळाडू अक्षरशः अवाक झाले आहेत.
‘मला जरा जास्तच स्मार्ट बनवलंय!’; स्वतःचा रेट्रो लूक पाहून वैभव सूर्यवंशी चकित
मालिकेच्या पूर्वसंध्येला झालेल्या फोटोसेशनदरम्यान खेळाडूंना त्यांचे ८० च्या दशकातील विंटेज फोटो दाखवण्यात आले. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) जेव्हा टेबलवर ठेवलेला स्वतःचा रेट्रो फोटो पाहिला, तेव्हा तो आश्चर्याने म्हणाला, “मला काही जास्तच स्मार्ट बनवलंय!” त्याचा हा अवतार पाहून अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनेही हसत टिप्पणी केली की, “सध्या तो लहान मूल वाटतोय, पण फोटोत एकदम मोठा माणूस दिसतोय.” तर संघात नव्याने दाखल झालेल्या यश ठाकूरने म्हटले की, “सगळे खेळाडू ओळखू येत आहेत, फक्त वैभव सूर्यवंशी ओळखता येत नाहीये.”
Vintage vibes. Priceless reactions. 😂
🎥 #TeamIndia takes on the 1980s trend 😉 – By @RajalArora #AFGvIND pic.twitter.com/nSaClHHdyn
— BCCI (@BCCI) September 12, 2026
घरच्या मैदानावर पदार्पणाची संधी; वैभवसाठी मालिका ठरणार अग्निपरीक्षा!
अवघ्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने यापूर्वी इंग्लंड आणि झिम्बाब्वे या दोन्ही परदेशी दौऱ्यांवर धडाकेबाज खेळ दाखवला आहे. आता पहिल्यांदाच त्याला मायदेशातील मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. डावाची सुरुवात करताना तो अभिषेक शर्मासोबत सलामीला उतरण्याची दाट शक्यता असून, स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याच्यासाठी ही मालिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वीची रंगीत तालीम; खेळाडूंच्या फिटनेसवर राहणार नजर!
जपानमध्ये रंगणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) च्या पार्श्वभूमीवर भारतीय संघासाठी ही मालिका पूर्वतयारीची मोठी संधी मानली जात आहे. विशेषतः नवोदित खेळाडूंचे प्रदर्शन आणि दुखापतींमधून सावरलेल्या खेळाडूंची तंदुरुस्ती यावर संघ व्यवस्थापनाची करडी नजर राहणार आहे. मालिकेतील पहिला सामना १३ सप्टेंबरला, दुसरा १५ सप्टेंबरला आणि अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी दिल्लीत पार पडेल.





