Jay Shah- ICC President : – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) नवे अध्यक्ष होऊ शकतात. ते विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांची जागा घेऊ शकतात. ग्रेग बार्कले यांनी स्पष्ट केले आहे की, ते त्यांच्या तिसऱ्या टर्मसाठी निवडणुकीत उभे राहणार नाहीत. सध्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ते हे पद सोडणार आहेत. प्रसारमाध्यमांच्या सूत्रांच्या हवाल्याने, आता जय शहा यांची या पदावर निवड होऊ शकते, हे निश्चित दिसते. असे झाल्यास ते ICC चे सर्वात तरुण अध्यक्ष (35 वर्षे) होतील.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे जय शहा हे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी पसंतीचा चेहरा म्हणून समोर येत आहेत. सध्याच्या घडीला न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले हे आयसीसीचे अध्यक्ष असून त्यांचा कार्यकाळ हा 30 नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे. यासाठी आयसीसीकडून सध्या कार्यरत असलेल्या 16 संचालकांना नामांकन भरण्यासाठी 27 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होऊन नवीन अध्यक्ष 1 डिसेंबर पासून पदभार स्वीकारणार आहेत.
बीसीसीआयचे सचिव असलेले 35 वर्षीय जय शहा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या पाठिंब्यावर अध्यक्ष निवडले जाऊ शकतात. मात्र, त्याची निवड झाल्यास त्यांचा बीसीसीआयचे सचिवपद सोडावे लागणार आहे. त्यांची या पदावर निवड झाल्यास ते आयसीसीचे अध्यक्ष बनणारे 5 वे भारतीय असतील. त्यांच्या आधी जगमोहन दालमिया (1997-2000), शरद पवार (2010-2012), एन. श्रीनिवासन (2014 – 2015) आणि शशांक मनोहर (2015 – 2020) यांनी हे पद भूषविले आहे.
IND vs AUS : बुमराह सर्वच प्रकारातील अव्वल गोलंदाज..! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने उधळली स्तुतिसुमने
शाह यांना यासाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डांचे समर्थन मिळत आहे. याशिवाय इतर अनेक क्रिकेट बोर्डही जय शाह यांना पाठिंबा देणार आहेत. पण खरंच शहांना आयसीसीचं हे मोठं पद भूषवायचं आहे की नाही? त्यासाठी 27 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण उमेदवारी अर्ज भरण्याची ही शेवटची तारीख आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण 16 मते आहेत आणि विजेत्याला 9 मतांचे साधे बहुमत (50 टक्क्यांहून अधिक) आवश्यक आहे.