BCCI Sacks Coaches After Test Series Debacle : भारतीय संघाबद्दल मोठी बातमी समोर येत आहे, जिथे नवीन अहवालांमध्ये धक्कादायक खुलासे झाले आहेत. भारतीय फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांना पदावरून हटवण्यात आल्याचे वृत्त आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १-३ अशा निराशाजनक कसोटी मालिकेतील पराभवानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मासह अनेक मोठे खेळाडू वाईटरित्या अपयशी ठरले होते.
बीसीसीआयने दिला कडक इशारा –
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोचिंग स्टाफ आणि इतर अनेक सदस्यांना काढून टाकून, बीसीसीआयने कडक इशारा दिला आहे की कसोटीतील भारतीय संघाच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दारुण पराभवानंतर अभिषेकवर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर बीसीसीआयने एनसीए आणि इंडिया अ संघाचे प्रशिक्षक सीतांशू कोटक यांची भारतीय संघातील मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. भारताने पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यावेळी अभिषेक, रायन टेन, मॉर्केल आणि दिलीप हे देखील त्यावेळी संघातील कर्मचाऱ्यांचा भाग होते.
🚨 BCCI CHANGE COACHING STAFF. 🚨
– The BCCI set to remove Abhishek Nayar from the coaching duties. (Abhishek Tripathi). pic.twitter.com/qqlqrB77i5
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 17, 2025
बीसीसीआयने कोणाकोणाची केली हकालपट्टी?
आता दिलीप, सोहम आणि अभिषेक यांना काढून टाकण्यात आले आहे. गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली, तेव्हा अभिषेकची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केवळ आठ महिन्यांपूर्वी झाली होती. तथापि, आता त्याला सहाय्यक प्रशिक्षक म्हणून त्याच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यासोबतच क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे. याशिवाय, संघातील खेळाडूंना मसाज करणाऱ्या एका स्टाफ मेंबरलाही काढून टाकण्यात आले आहे.
हेही वाचा – RCB Sues Uber Moto : ट्रॅव्हिस हेडच्या जाहिरातीवरून RCB संतप्त, दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल
सध्या, सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेश्टे हे टी दिलीप यांच्या जागी तात्पुरते क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारतील. नायर आणि दिलीप यांच्या जागी अद्याप कोणत्याही खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु सध्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसोबत असलेले दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक एड्रियन ले रॉक्स हे सोहम देसाई यांच्या जागी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच म्हणून जबाबदारी स्वीकारतील.