BCCI Age Fraud : क्रिकेट विश्वात खळबळ! बीसीसीआयने रोहितसह ६४ खेळाडूंवर घातली बंदी, नेमकं कारण काय? जाणून घ्या
BCCI Age Fraud : बीसीसीआयने एकाच झटक्यात तब्बल ६४ खेळाडूंवर बंदी घातली आहे, नेमकं कारण काय जाणून घेऊया.

BCCI Bans 64 Players For Age Fraud World Cup Winner Ravi Kumar Rohit Yadav Suspended : बीसीसीआयने वय लपवून फसवणूक करणाऱ्या खेळाडूंविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कठोर मोहीम उघडली आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या (CAB) प्री-सीझन पडताळणी मोहिमेत वयाचा मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बीसीसीआयने एकाच झटक्यात तब्बल ६४ खेळाडूंवर बंदी घातली आहे. विशेष म्हणजे, बंदी घातलेल्या या खेळाडूंमध्ये २०२२ चा अंडर-१९ विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज रवी कुमार आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच निवडलेल्या अंडर-१९ संघातील लेग स्पिनर रोहित यादव यांचा समावेश असल्याने क्रिकेट जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे.
रोहित यादवच्या वयात २७ महिन्यांचा फेरफार; संघातून थेट हकालपट्टी!
ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाविरुद्धच्या आगामी ५ एकदिवसीय आणि २ चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित यादवची नुकतीच भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, बंगालकडून वयोगट स्पर्धा खेळणाऱ्या रोहितच्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली असता, त्याच्या खऱ्या वयात आणि नोंदवलेल्या वयात तब्बल २७ महिन्यांची तफावत आढळून आली. घोटाळा समोर येताच बीसीसीआयने त्याला तत्काळ भारतीय संघातून हाकलले असून त्याच्यावर दोन वर्षांची बंदी लादली आहे.
वर्ल्डकप विजेता रवी कुमार ४५ महिने मोठा; कागदपत्रांची सखोल झाडाझडती!
CAB Bars 65 Cricketers Over Alleged Age Fraud 🚨
The Cricket Association of Bengal has barred 65 cricketers following allegations of age-related fraud, in a move that has sent shockwaves through Bengal’s cricketing circles. The list includes current India U19 international… pic.twitter.com/ssb3qIQapg
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) September 4, 2026
पीटीआयने (PTI) दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये भारताला अंडर-१९ जगज्जेतेपद मिळवून देणाऱ्या प्रमुख खेळाडूंपैकी एक असलेला रवी कुमार आणि फिरकीपटू विशाल भाटी यांच्यावरही ही कारवाई झाली आहे. सीएबीच्या अधिकृत तपासणीत रवी कुमारच्या वयात तब्बल ४५ महिन्यांहून अधिक (सुमारे पावणेचार वर्षे) फरक आढळून आला. खेळाडूंच्या जन्म दाखल्यांची आणि शाळा-कॉलेजच्या शैक्षणिक नोंदींची कसून तपासणी केल्यानंतर ही धक्कादायक आकडेवारी उघड झाली.
सर्व राज्य संघटनांना तत्काळ आदेश जारी; ‘झिरो टॉलरन्स’ धोरण लागू –
बीसीसीआयने या ६४ खेळाडूंच्या निलंबनाची अधिकृत यादी सर्व राज्य क्रिकेट संघटनांना पाठवली असून हा निर्णय त्वरित प्रभावाने लागू करण्यात आला आहे. अंडर-१९ आणि इतर वयोगटातील स्पर्धांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. वयाची खोटी प्रमाणपत्रे सादर करून युवा खेळाडूंचे हक्क हिरावून घेणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम बीसीसीआयने या कारवाईतून दिला आहे.





