बावनकुळेंना मंत्रीपदासाठी संधी; भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याचे नाव आघाडीवर?

Maharashtra Cabinet Expansion | महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराचे काउंटडाउन आता सुरू झाले आहे. या शपथविधी समारंभासाठी अनेक आमदारांना फोनही गेले आहे. नागपुरात आज अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दुपारी 4 वाजता हा शपथविधी समारोह पार पडणार आहे. तब्बल 33 वर्षांनी नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असल्याने जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आज साधारण 30 ते 35 आमदार मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यात अनेक जुन्या नेत्यांना डच्चू देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहरा
यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीत आहे. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहरा दिसणार असल्याची दाट शक्यता आहे. आता प्रदेशाध्यक्ष पदासाठी नेमकी कोणाची वर्णी लागणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यादरम्यान सध्या एक नाव चर्चेत आले आहे.
रविंद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत
माजी कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांना मंत्रिपदाऐवजी पक्षात एक मोठी संधी दिली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी रविंद्र चव्हाण यांनी अमित शाहांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांना यापुढे पक्षात त्यांच्यावर कोणती जबाबदारी असेल याबद्दलची माहिती देण्यात आली.
रविंद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी आहेत. त्यांनी गेल्या तीन निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. आता सलग चौथ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले. यानंतर आता त्यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता आहे. Maharashtra Cabinet Expansion |
रविंद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
रविंद्र चव्हाण हे 2007 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले. 2009 मध्ये तत्कालीन भाजप आमदार हरिश्चंद्र पाटील यांचे तिकीट कापून रविंद्र चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली आणि ते 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. Maharashtra Cabinet Expansion |
यानंतर 2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांनी शपथ घेतली. 2016 साली त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. 2022 मध्ये शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले होते. त्यांनी सिंधूदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला. यानंतर 2024 मध्ये चौथ्यांदा डोंबिवलीतून आमदार झाले. मात्र रविंद्र चव्हाण यांना एकनाथ शिंदे यांचे विरोधक म्हणूनही ओळखले जाते. आता त्यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:





