नेवासा : “पाणीपट्टी घ्या वर्षाची, पाणी द्या वर्षातून दोन-तीन महिने, आणि वरून २२ टक्के शास्ती करही लावा!” असा जनआक्रोश करत नेवासा शहरातील पाणीपुरवठ्याच्या गलथान कारभाराविरोधात शुक्रवार (१९ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता ‘मी नेवासकर’ संघटनेने अनोखे ‘अंघोळ’ आंदोलन उभे केले. नगरपंचायत कार्यालयासमोर वाजत-गाजत केलेल्या या आंदोलनाने अधिकाऱ्यांची झोप उडवली असून, शहरवासीयांच्या सौम्यतेचा अंत होत असल्याचा इशाराही देण्यात आला. शहरात १५ ते २० दिवसांतून फक्त एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या प्रचंड हाल होत आहेत. या संकटावरून शांताराम गायके यांनी नगरपंचायत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नेवासा शहराला वेळीच सुधारित पाणीपुरवठा सुरू करा, स्वतंत्र एक्सप्रेस फीडरवर विजपुरवठा सुरळीत करा,” अशी मागणी करत समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी एकमुखी आवाज लावला. संघटनेचे पदाधिकारी विकास चव्हाण म्हणाले, “नागरिकांच्या सौम्यतेचा अंत नगरपंचायत, महाविज वितरण आणि प्रशासनाने पाहू नये. अन्यथा नेवासकरांच्या उद्रेकापुढे अधिकाऱ्यांची पळताभुई होईल. नगरपंचायत चौकात आंदोलकांनी वाजत-गाजत संस्थेच्या कारभाराचे ‘वाभाडे’ काढले. शहरवासी, विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी करून या आंदोलनाला प्रतिसाद दिला. यावेळी अनिल सोनवणे, शिवा राजगिरे, शिवाजी गायकवाड, मनेश चव्हाण, प्रकाश चव्हाण, हारून जाहागिरदार, नवीद शेख, संपत लष्करे, रौफ सैय्यद, राजू कनगरे, आसिफ अली पठाण, संपत आळपे, रेलकरताई व्यवहारेताई, शोभाताई आलावणे आदी उपस्थित होते. नेवासा पोलिस ठाण्याचे पीआय महेश पाटील यांनी पोलिस फौजफाटा तैनात ठेवला असला तरी शांततेने चाललेल्या आंदोलनाने वातावरण तापले. मी नेवासकर संघटनेच्यावतीने पुकारलेल्या आंदोलनाच्या भावनांचा आदर करून नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष लांडगे आणि विद्युत महामंडळाचे कार्यकारी उपअभियंता बडवे यांनी लेखी आश्वासन देऊन येत्या आठ दिवसांमध्ये नेवासा शहराचा पाणी पुरवठा व एक्सप्रेस फिडरवर विजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, हे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले.