इस्रायल-इराण संघर्षाचा बासमतीला फटका

पुणे – इस्रायल- इराण संघर्ष सध्या निवळला असला तरी युद्धामुळे देशाची तांदळाची निर्यात ३० टक्क्यांनी घटली आहे. यामुळे बाजारांत मागणी कमी असूनही साठा जास्त झाला आहे. किरकोळ बाजारातील दर स्थिर असल्याने ग्राहकांना साठवणुकीचा फायदा झालेला नाही.
इराण हा भारतीय तांदळाचा सर्वांत मोठा आयातदार आहे. देशातील बासमती तांदळापैकी २५ टक्के तांदूळ इराणला जातो. इराणचा पुरवठा कमी झाल्याने बासमतीच्या दरात वाढ झाली आहे. मागणी कमी आणि साठा जास्त अशी स्थिती असल्याने दर कमी होण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात सहा महिन्यांपासून दर स्थिर आहेत. किरकोळ बाजारांत बासमती तुकडा, मोगरा प्रत्येकी साठ, कणी चाळीस, आणि अख्खा बासमती शंभर ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विकला जातो.
पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये बासमतीची लागवड होते. निर्यात कमी झाल्याचा फटका तेथे जाणवतो. मध्यंतरी विमा कंपन्यांनी इराणला तांदूळ निर्यातीसाठी विमा देणे बंद केले होते. लाल समुद्राचा व्यापारी मार्ग हा भूमध्य समुद्राला हिंदी महासागराशी जोडणारा महत्त्वाचा जलमार्ग आहे.
हा मार्ग युरोप आणि आशिया व्यापारासाठी खुष्कीचा मानला जातो. दोन देशांतील संघर्षामुळे या मार्गालाही धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर केप ऑफ गुड होप हा सुरक्षित मार्ग असला तरी तो लांब अंतराचा असल्याने वाहतूक खर्चात वाढ होते.
‘इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम देशाच्या बासमतीच्या निर्यातीवर झाला आहे. तीन महिन्यांत नेहमीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी निर्यात घटली आहे.’ – राजेंद्र बाठिया, तांदळाचे व्यापारी व निर्यातदार.





