“जालियनवाला प्रमाणे बारसू हत्याकांड होईल…’ संजय राऊतांचा खळजनक दावा

मुंबई – रत्नागिरीतील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी सरकारकडून आंदोलकांवर गोळीबार होऊ शकतो. जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे बारसू हत्याकांड होईल अशी भीती आहे, असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी सध्या सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यावर आज पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, बारसूला स्थानिकांचा विरोध आहे. चार ते सहा हजार कुटुंब प्रशासनाला विरोध करण्यासाठी माळारानावर एकत्र आले आहे. मात्र, सरकारकडून दडपशाही सुरू आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. अनेक कुटुंबांना धमक्या दिल्या जात आहे. अनेक कुटुंब परागंदा झाले आहे.
अनेकांना तडीपारीच्या नोटीसा बजावल्या जात आहेत. त्यामुळे आम्ही लोकांसोबत आहोत. अशा दडपशाहीच्या वेळेस शिवसेना स्वस्थ बसणार नाही. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मुंबईतील काही जणांनाही अटक करण्यात आली आहे. हे सरकार विकृत आणि दहशतवादी मनोवृत्तीचे आहे. त्यामुळे स्थानिकांना पाठिंबा देण्यासाठी आणि दडपशाहीला विरोध करण्यासाठी आम्हीदेखील मैदानात उतरणार आहोत. स्थानिकांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही बारसू येथेही जाणार आहोत.
परप्रांतियांची जमिन खरेदी
राऊत पुढे म्हणाले, बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार यामुळे अनेक परप्रांतियांनी येथे जमिनी खरेदी केल्या आहेत. या परप्रांतियांच्या फायद्यासाठीच रिफायनरी प्रकल्पाचा घाट घातला जात आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मानवतेची थोडी जरी ज्योत असेल तर त्यांनी या दडपशाहीला रोखावे.
सीमाभागात जाणार
दरम्यान, कर्नाटक निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करण्यासाठी आपण 3 व 4 मे रोजी सीमाभागात जाणार असल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगितले. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला यावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री येणार नसतील तर सीमाभागाच्या लढाईत मी लाठ्या खाल्ल्या, असे खोटे दाखले त्यांनी देऊ नयेत.





