Baramti News | बारामती रेशीम बाजारात विक्रमी उलाढाल ; शेतकऱ्यांना उच्चांकी दराची मिळवली संधी..

प्रभात वृत्तसेवा
बारामती – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीमकोष बाजारात विक्रमी उलाढाल झाले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व महाराष्ट्र राज्यातील व्यापाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे. दि. २६ जून ते २५ जुलै या कालावधीत १ कोटी १६ लाख ८१ हजार ५८६ रुपयांची उलाढाल झाली आहे. २२२ शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या २३ टन रेशीमकोषांना प्रतिकिलो ५०० ते ५५० रुपये असा उच्चांकी बाजारभाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील महिन्यात १४ रिलर्सनी या खरेदी-विक्रीत सहभाग घेतला.
एप्रिल २०२२ पासून सुरू झालेल्या बारामती रेशीम कोष बाजारपेठेने आतापर्यंत तीन हजार ६३ शेतकऱ्यांना आपले २४७ टन ११४ किलो रेशीम कोष विक्रीची संधी उपलब्ध करून दिली आहे. या कालावधीत १२ कोटी ८ लाख ३२ हजार १३५ रुपयांची एकूण उलाढाल झाली आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर यासह राज्यभरातील शेतकरी या बाजारात आपले कोष विक्रीसाठी आणत आहेत. १४ रिलर्सनी या खरेदी-विक्रीत सहभाग घेतला, जे ई-नाम प्रणालीच्या वेबसाइटवर नोंदणीकृत आहेत.
“बारामती रेशीम बाजारात ई-नाम प्रणालीद्वारे ऑनलाइन लिलाव आणि पारदर्शक व्यवहार होतात. अचूक वजन आणि व्यवस्थित विक्री प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना इतर राज्यांतील बाजारांप्रमाणे चांगले दर मिळत आहेत. शेतकऱ्यांना ग्रेडिंग आणि स्वच्छ केलेले रेशीम कोष बाजारात आणण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कोषांना जास्त दर मिळण्यास मदत होते.”
– विश्वास आटोळे, सभापती, रामचंद्र खलाटे, उपसभापती.
“सध्या बारामती बाजार समितीमध्ये देशातील चार राज्यातून ऑनलाईन पद्धतीने रेशीम व्यापार सुरू आहे.
ऑनलाइन लिलाव, पारदर्शक व्यवहार आणि अचूक वजन यामुळे शेतकरी बारामती रेशीम बाजाराकडे आकर्षित होत आहेत. शासनाच्या पाठिंब्याने बारामती मुख्य यार्डमध्ये रेशीम कोष बाजारपेठ आणि कोषोत्तर प्रक्रिया व प्रशिक्षण इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यामुळे भविष्यात शेतकरी आणि रिलर्स यांना सर्व आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून, बारामती रेशीम बाजार एक भव्य आणि अग्रगण्य बाजारपेठ बनणार आहे.”
– अरविंद जगताप, सचिव, बारामती बाजार समिती.
रेशीम बाजारपेठ विश्वासार्ह..
बाजार समिती शेतकरी आणि रिलर्स यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत आहे. शेतकऱ्यांनी आपले रेशीमकोष ग्रेडिंग आणि स्वच्छ करून आणल्यास त्यांना जास्त दर मिळण्याची शक्यता आहे. या सुविधांमुळे आणि पारदर्शक व्यवहारांमुळे बारामती रेशीम बाजार शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण बनले आहे.





