Baramati News : दिवसभर वीज नसल्याने बारामतीकरांची गैरसोय

बारामती : बारामती एमआयडीसी महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही उपकेंद्रातून महावितरणच्या ऊर्जाभवन, बारामती सिटी ३३ केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या उच्चदाब वीज वाहिनीची केबल तुटल्याने शहराचा बहुतांश भागाचा वीजपुरवठा आज (दि.२६) दुपारपासून ठप्प झाला आहे.
त्यामुळे बारामतीकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सिद्धेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मात्र वीज नसल्याने रात्रीच्या वेळी भाविक भक्तांचे हाल झाले. बारामती शहरात दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांच्या कार्यालयीन कामाचा खोळंबा झाला.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सिद्धेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात दिवसभर गर्दी होती. तसेच रात्रीच्या वेळी देखील भाविक दर्शनासाठी रांगा लावून उभे आहेत. मात्र वारंवार वीज गायब होत असल्याने नागरिकांनी अंधारात व सुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली.
विज नसल्याने चोरट्यांची देखील फावले, अंधाराचा फायदा घेत किरकोळ चोऱ्यांचे प्रमाण देखील मंदिर परिसरात घडले. दिवसभर विज नसल्याने आधीच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. केबल जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे.





