Baramati News : बारामतीची सत्ता कोणाकडे? ९ वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर, अनेक गणांमध्ये तिरंगी लढतींचे संकेत

प्रभात वृत्तसेवा
बारामती – नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बारामती तालुक्यातील पंचायत समिती निवडणूक रंगात आली आहे. सोमवारी (ता. १३) कवीवर्य मोरोपंत सभागृहात झालेल्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय वातावरण तापले असून, तालुक्यातील ग्रामपातळीवर नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे. पणदरे गटातून सर्वसाधारण, निंबूत गटातून सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांच्या दांड्या गूल झाल्या आहेत.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली याआधी ९ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती सभापती पदासाठी सोडत काढण्यात आली होती.
ही सोडत सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव निघाल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानंतर आता निर्वाचक गण आरक्षण जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांना नवं वळण मिळाले आहे. सोडतीनुसार सुपा, काहाटी, मुढाळे या गटांना सर्वसाधारण महिला प्रवर्ग, शिर्सुफळ, पणदरे, वडगांव निंबाळकर, निंबूत हे सर्वसाधारण प्रवर्ग, गुनवडी अनुसूचित जाती महिला, मोरगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), कांबळेश्वर, डोर्लेवाडी ओबीसी महिला, तर नीरावागज अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठरले आहेत.
नऊ वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीमुळे बारामती तालुक्यातील राजकीय रंगत पुन्हा एकदा शिगेला पोहोचली आहे. ग्रामपातळीवर कार्यरत असलेले अनेक तरुण आणि नवोदित नेते निवडणुकीच्या तयारीसाठी पुढे सरसावले आहेत. इच्छुक उमेदवारांनी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, गटबाजी आणि नव्या राजकीय आघाड्या तयार होण्यास सुरुवात झाली आहे.
पंचायत समिती निवडणूक ही केवळ ग्रामविकासासाठीची लढत न राहता राजकीय शक्तीपरीक्षेचे रणांगण ठरणार आहे. बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीमुळे अनेक गणांमध्ये तिरंगी आणि चौरंगी लढती होतील, अशी दाट शक्यता व्यक्त होत आहे. एकूणच, पंचायत समितीवरील सत्ता कोणाच्या हातात जाते हे पाहणे आता बारामतीच्या मतदारांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
पणदरे, निंबूत गटाकडे लक्ष..
जिल्हा परिषद गटात आरक्षण पुढीलप्रमाणे- सुपा (नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव), गुणवडी (अनुसूचित जाती महिला राखीव), पणदरे (सर्वसाधारण), वडगाव निंबाळकर (सर्वसाधारण महिला राखीव), निंबूत (सर्वसाधारण), नीरा वागज (अनुसूचित जाती).
चार गणांत जोरदार चुरस..
पंचायत समिती गण आरक्षण पुढीलप्रमाणे- सुपा- (सर्वसाधारण महिला राखीव), काऱ्हाटी (सर्वसाधारण महिला राखीव), शिर्सुफळ (सर्वसाधारण), गुणवडी (अनुसूचित जाती महिला राखीव), पणदरे (सर्वसाधारण), मुढाळे (सर्वसाधारण महिला राखीव), मोरगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग) वडगाव निंबाळकर (सर्वसाधारण), निंबूत (सर्वसाधारण), कांबळेश्वर (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव), नीरावागज (अनुसूचित जाती), डोर्लेवाडी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव).





