Baramati News: बारामतीला देशातील सर्वात सुंदर शहर बनवणार; नगराध्यक्ष सचिन सातव यांची ग्वाही

प्रभात वृत्तसेवा
बारामती – शहरातील नागरिकाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा प्रयत्न असेल. मूलभूत सुविधा देण्यासोबतच बारामतीचा नावलौकीक वाढविण्यासाठी माझ्यासह सर्व माझे सहकारी नगरसेवक मनापासून काम करु, अशी ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यभार सचिन सातव यांनी (दि.१) रोजी स्वीकारला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही ग्वाही दिली.
याप्रसंगी मुख्याधिकारी पंकज भुसे, सर्व नगरसेवक उपस्थित होते.सातव म्हणाले, बारामतीच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो माझ्यासाठी सन्मान आहेच. सोबतच मोठी जबाबदारी आहे. बारामतीला देशातील सर्वात सुंदर शहर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनेत्रा पवार यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक जिवाचे रान करु.
अजित पवार यांनी जी संधी दिली आहे. त्याचे सोने करुन दाखविण्यासाठी पाच वर्ष झटून काम करु.मुलभूत प्रश्नांवर बोलताना सातव म्हणाले की, बारामती शहरातील नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांना आमचे सर्वाधिक प्राधान्य असेल. स्वच्छता, पुरेसे पिण्याचे पाणी, खड्डेमुक्त रस्ते,
नव्याने होत असलेल्या उपनगरात भुयारी गटार योजना, घनकचरा व्यवस्थापन, पार्किंगची समस्या दूर करण्यासह आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांवर भर देणार आहे. अधिकाधिक डिजिटल सेवा, पारदर्शक प्रशासन आणि जलद निर्णयप्रक्रियेला आमचे प्राधान्य असेल.





