प्रभात वृत्तसेवा माळेगाव – माळेगाव बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते अनिकेत बोबडे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख २२ हजार २२२ रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्त केला. सामाजिक कार्यकर्ते अनिकेत बोबडे यांच्या योगदानामुळे सामाजिक बांधिलकी आणि सार्वजनिक हितासाठी त्यांची भूमिका अधोरेखित झाली आहे.अनिकेत बोबडे हे शिवज्ञ प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून वंचित घटकांसाठी शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवतात. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव बुद्रुक क्रमांक १ येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले होते. उपक्रमात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि देणाऱ्याच्या डोळ्यांत भाव दिसून आले होते. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेला निधी हे त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचे प्रतीक मानले जात असून स्थानिक पातळीवर त्यांच्या कार्याची सकारात्मक चर्चा सुरू आहे.