प्रभात वृत्तसेवा डोर्लेवाडी – बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायतीत विविध विकासकामांमध्ये गंभीर स्वरूपाची दप्तरी अनियमितता आढळून आल्याने तीन तत्कालीन सरपंचापैकी दोन तत्कालीन सरपंच नितीन ज्योतीराम शेडगे, तत्कालीन सरपंच वैशाली संतोष मासाळ यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली आहे. यात त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून देखील काढून टाकण्याचा आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुंडकुलवार यांनी दिले आहेत.झारगडवाडी ग्रामपंचायतीत २०२०-२१ ते २०२३ – २४ मध्ये झालेल्या विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याचे सात मुद्द्यांच्या आधारे सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समिती स्थापन करून त्या मुद्द्याच्या अनुषंगाने सखोल दप्तर तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दप्तर तपासणीनंतर समितीने अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय व दप्तरी अनियमितता असल्याचे उघड झाले होते.पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार दालनात सुनावणी घेऊन दोन्ही बाजूच्या दस्तऐवजाच्या आधारे ग्रामपंचायत गंभीर दप्तरात अनियमितता असल्याचे शिक्कामोर्तब करून अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर केला होता. त्यामुळे पुणे विभागीय आयुक्तांच्या कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विभागीय आयुक्त डॉ. पुंडकुलवार यांनी अर्जदार पोटे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व बाबी तपासून तीन तत्कालीन सरपंचापैकी दोन तत्कालीन सरपंचावर अपात्रतेची कारवाई केली आहे. त्यांचे सदस्यपदही अपात्र केल्याचा निकाल (दि.२३) रोजी दिला आहे. याबाबत अर्जदाराच्यावतीने स्वतः ॲड. युवराज पोटे यांनी बाजू मांडली होती तर अपात्र तत्कालीन सरपंचाच्या वतीने ॲड. खान यांनी बाजू मांडली होती. बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत झारगडवाडी गावामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व बेकायदेशीर कामे चालली होती याविरुद्ध मी तक्रार दिली होती. 23 सप्टेंबर 25 रोजी आयुक्तांनी आदेश देऊन दोघांना अपात्र केले तरी अपहारातील रक्कम वसुली व ग्रामपंचायत कागदपत्रांमधील फेरफाराबाबत पाठपुरावा करून न्यायाची मागणी पुणे विभागीय आयुक्त व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार आहे. -ॲड. युवराज पोटे, सामाजिक कार्यकर्ते, डोर्लेवाडी. हा निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता. याबाबत आम्ही वरिष्ठ न्यायालयात लवकरच दाद मागणार असून खरी वस्तुस्थिती कोर्टासमोर मांडणार आहोत. न्यायदेवता आम्हाला न्याय देतील, अशी आम्हाला खात्री आहे, असे अपात्र झालेल्या तत्कालीन सरपंच वैशाली संतोष मासाळ यांनी सांगितले आहे.