Baramati News | ओबीसी आंदोलकांचा निर्धार ; हिम्मत असेल तर अटक करा,आम्ही जेलमधून आरक्षणासाठी लढू

प्रभात वृत्तसेवा
बारामती – बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके, अॅड. मंगेश ससाने यांच्यासह एकूण 14 आंदोलक 15 सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात हजर राहून स्वतःला अटक करून घेणार आहेत. ओबीसी बहुजन समाजाचा लढा आम्ही जेलमधून लढू, प्रशासनाला हिम्मत असेल तर आम्हाला अटक करावी, असा इशारा आंदोलकांनी पत्रकार परिषदेत दिला.
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आझाद मैदान, मुंबई येथे तसेच इतर ठिकाणी मनोज जरांगे यांनी ओबीसी धनगर बहुजन समाजावर केलेल्या अश्लील, गलिच्छ आणि अपमानकारक वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळली होती. त्यांना अटक करण्याची मागणी ओबीसी समाजाकडून वारंवार करण्यात आली. तसेच सरकारने मराठा आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका मांडावी अशीही मागणी करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर 5 सप्टेंबर रोजी बारामतीत सकल ओबीसी बहुजन समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. याआधी 2 सप्टेंबर रोजी निवेदन देऊन जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आयोजकांनी केली होती. 3, 4 आणि 5 सप्टेंबर रोजी परवानगीसाठी सतत प्रयत्न करूनही पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाने सहकार्य न करता उलट धमक्या दिल्या, असा आरोप करण्यात आला.
मोर्चा अत्यंत शांततेत, संविधानिक मार्गाने, पारंपारिक वेशभूषा व सांस्कृतिक परंपरा जपत यशस्वीरीत्या पार पडला. तरीदेखील जरांगे यांच्यावर कारवाई झाली नाही. उलट आकसाने 14 नेत्यांवर गुन्हे दाखल करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला, असे आंदोलकांनी सांगितले.आम्ही प्राणाची पर्वा न करता ओबीसी धनगर बहुजन समाजाचे अस्तित्व आणि आरक्षण वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस नवनाथ पडळकर, चंद्रकांत वाघमोडे, बापूसाहेब सोलनकर, जी. बी. गावडे, गोविंद देवकाते, विठ्ठल देवकाते, किशोर हिंगणे, काळूराम चौधरी, अमोल सातकर, असिफ खान, किशोर मासाळ हे उपस्थित होते.
मोर्चाची पार्श्वभूमी
-2 सप्टेंबर : जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाला निवेदन
-3-5 सप्टेंबर : मोर्चासाठी वारंवार परवानगीची मागणी, मात्र पोलिसांनी नाकारली
-5 सप्टेंबर : सकल ओबीसी बहुजन समाजाचा शांततापूर्ण भव्य मोर्चा बारामतीत पार पडला
-मोर्चा पारंपारिक वेशभूषा, सांस्कृतिक परंपरा जपत, संविधानिक पद्धतीने निघाला.
-तरीदेखील पोलिसांनी 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला.
-बारामती ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना ओबीसी नेते.





