Baramati News – मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात बुधवारी रोहित पवार यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली होती. त्यानंतर आज बारामतीत देखील रोहित पवार आक्रमक झाले होते. असे असले तरी देखील बारामती पोलिसांनी रोहित पवार यांची तक्रार घेतली; परंतु गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. आम्ही हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले आहे, ते तपास करत आहेत. असे पोलीस अधिकार्यांकडून सांगण्यात आले. रोहित पवार, युगेंद्र पवार यांच्यासह बारामतीतील वकील मंडळींनी कायद्यानुसार गुन्हा दाखल करता येऊ शकतो हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील सर्व बाजू आणि घटनाक्रम त्यांनी पोलिसांसमोर सविस्तरपणे मांडला. सुमारे दीड तास वेळ देऊन आणि सविस्तर स्पष्टीकरण देऊनही, अखेर पोलिसांकडून त्यांच्या पदरी निराशाच पडली. पोलिसांनी कायदेशीर बाबी किंवा इतर तांत्रिक कारणे पुढे करत डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीवर तात्काळ एफआयआर दाखल करण्यास आपली असमर्थता दर्शवली. “जर एखादी दखलपात्र घटना घडली असेल तर फिर्याद दाखल झाली पाहिजे. कोणी फिर्यादी नसेल तर पोलिसांनी स्वतः फिर्याद दाखल केली पाहिजे, अशी कायद्यात तरतूद आहे. लोकनेते अजित पवार जाऊन एक महिना होत आहे; परंतु अद्याप एफआयआर दाखल नाही. अपघाताची केस दखलपात्र आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी माहिती व पुरावे गोळा केले आहेत. ते सादर करतील. विमान कंपनीचे मालक यांच्यावर कायद्याने गुन्हा दाखल झाला पाहिजे.” – अॅड. प्रसाद खरतुडे, अध्यक्ष बारामती वकील संघटना बारामती वकील संघटना आक्रमक दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी बारामतीत वकील संघटना आक्रमक झाली. बारामती तालुका पोलीस ठाणे बाहेर शेकडो वकिलांनी ठिय्या मांडला. अपघात दखलपात्र असल्याने कायद्यानुसार गुन्हा दाखल होतो. त्यामुळे डीजीसीए व कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी वकील संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी वकील मंडळींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.