बारामती : “वाहतूक नियम पाळा, चुकीचे पार्किंग करू नका, गर्दी टाळा,” अशा घोषणांनी बारामतीच्या रस्त्यांवर शिस्त आणण्याचा अनोखा उपक्रम सुरू झाला आहे. बारामती वाहतूक शाखा आणि बारामती नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत ‘घोषणारिक्षा’ शहरात फिरत आहे. ही रिक्षा मोठ्या फलकांसह आणि लाऊडस्पीकर वरून नागरिकांना वाहतूक नियमांची जाणीव करून देत आहे. नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई केली जात असून, अडथळे दूर करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या एका दुर्दैवी अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली आहेत. रस्त्यांवर उतरून पोलीस नागरिकांना सजग करत असून, या ‘मोठ्या आवाजा’च्या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, रस्त्यांवरील गर्दी कमी होत असून, वाहतूक अधिक सुसह्य होत आहे. अस्ताव्यस्त पार्किंग आणि सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यावर भर दिला जात आहे. नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर दंड आकारला जात असून, सूचना देऊनही अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. या मोहिमेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांच्या संकल्पनेमुळे वाहतूक शाखेवर नागरिकांचा विश्वास वाढला आहे. ही मोहीम भविष्यात सातत्याने राबविली जाणार असून, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यावर प्रशासनाचा भर आहे. “या उपक्रमामुळे भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यास नक्कीच मदत होईल,” असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांचा खडतर प्रवास सुलभ करणारी ही मोहीम शहरातील वाहतूक शिस्तीला नवी दिशा देणारी ठरत आहे.