Baramati News : उत्कृष्ट नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा व्यापारी असोसिएशनकडून सन्मान !

Baramati News : ‘दिपावली सणानिमित्त बारामती शहरात दरवर्षी होणाऱ्या वाहतुक कोंडीचे योग्य नियोजन करून यंदाच्या वर्षी शहरातील प्रत्येक नागरिकाला गर्दी आणि धक्काबुक्कीपासून सुरक्षित ठेवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा महावीर पथ व्यापारी असोसिएशनच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला. यामध्ये बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती नगरपरिषद अतिक्रमण विभागाचे सुनील धुमाळ, महावितरणचे कार्यकारी अधिकारी जामले आदींचा समावेश आहे.
यावेळी बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशीलकुमार सोमाणी, महावीर पथ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन बुधकर, नरेंद्र गुजराथी, आनंद महाडिक, ए.के.फकरुद्दीन, प्रशांत भोसले, गोकुळ लोळगे, संजय काबरा, सुधाकर गाढवे, अमोल पालकर, गणेश कदम, धीरज पवार, सोहेल तांबोळी, सुरजीत झगडे, ऋषिकेश निलाखे, जगदीश पंजाबी, मनोज खुटाळे, सम्यक छाजेड, अक्षय छाजेड, आशिष ढाकाळकर, अण्णा महाडिक, सोनिक पंदारकर, हार्दिक गुजराथी, यश झगडे व बारामती वाहतूक शाखेचे सुभाष काळे, प्रशांत चव्हाण, सुधाकर जाधव, प्रदीप काळे, सीमा घुले, माया निगडे, सीमा साबळे व प्रज्योत चव्हाण आदी उपस्थित होते.
बारामती शहरात दीपावली सणाच्या निमित्ताने खरेदीसाठी मोठी गर्दी होते. या कालावधीत बारामतीसह आसपासच्या तालुक्यातील व पंचक्रोशीतील नागरिक येतात. यावेळी हजारो वाहनांच्या बेशिस्त वाहतूकीमुळे आणि पार्किंगमुळे मोठी कोंडी होते. त्यामुळे सणासुदीच्या काळात तासंतास नागरिक अडकून पडतात.
ही बाब लक्षात घेत बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पूर्वनियोजित बैठक घेतली होती. रस्त्यावरील अतिक्रमण, गर्दी, वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी नेमक्या काय-काय उपाययोजना करता येतील? यावर चर्चा करत थेट अंमलबजावणी केली.
विशेष म्हणजे ग्राउंड लेव्हलला उतरून रस्त्यावर आलेली अतिक्रमणे, दुकाने आदींना मागे सरकावत दोऱ्यांचे प्रयोग राबवले, एकेरी वाहतुक करून विरुद्ध दिशेला जाणाऱ्यांवर कारवाई केली, वाहतूक पार्किंगसाठी अनेक ठिकाणे जाहीर करत त्याबाबत दिशादर्शक बोर्ड लावले, ज्या सूचना वाहतुक पोलिसांनी दिल्या आहेत त्यांचे योग्य पालन होत नसेल तर अशांवर कारवाईचा बडगा उगारला.
त्यामुळे बारामती व परिसरातुन येणाऱ्या नागरिकांनी नियम व अटींचे काटेकोरपणे पालन केले. यामुळे शहरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण बसून व्यापारी पेठा, रस्ते, वर्दीळीची ठिकाणे आदींनी मोकळा श्वास घेतला. याबरोबरच महावितरण प्रशासनाने व्यापार पेठेत लाईट चे चांगले नियोजन केले. रात्रीचे वेळी सुद्धा काम केले. प्रशासनाने अधिक काळजी घेत केलेल्या या सहकार्याबद्दल हा सन्मान करण्यात आला.





