Baramati News – शेतकऱ्यांचे नगदी पिक असलेल्या टोमॅटो पिकांना दरघटीचा सामना करावा लागत आहे. बारामती तालुक्यामध्ये टोमॅटो पीक घेण्यामध्ये होळ, सस्तेवाडी, आठ फाटा, चौधरवाडी, पळशी ही गावे अग्रेसर आहेत. टोमॅटोला भाव गडगडल्याने उत्पादित गावांत सरासरी साडेतीन कोटींचा फटका बसला आहे. कवडीमोल भावात विक्री करावी लागत असल्याने टोमॅटो मातीमोल झाला आहे. बारामती तालुक्यातील ही गावे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत योग्य नियोजन करीत आहे. त्यातून प्रति हेक्टरी ७० ते ८० टनांपर्यंत उत्पादन घेत आहे. परंतु बारामती तालुक्यातील काही बागायती पट्ट्यासह जिरायत भागामध्ये टोमॅटो पिकाची मोठ्या प्रमाणात शेती आहे. उसाप्रमाणे टोमॅटोलाही चांगल्या प्रकारे भाव मिळण्याची आशा असल्याने शेतकरी या नगदी पिकांकडे वळला आहे. परंतु यंदा मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक होत असल्याने भाव प्रति क्रेट शंभर ते दीडशे रुपयांवर आले आहेत. एका क्रेटमध्ये वीस ते पंचवीस किलो टोमॅटो असतो. पाच रुपये ते आठ रुपये किलोपर्यंत टोमॅटोचे भाव आले आहेत. दरवर्षी टोमॅटो हे पीक खर्चिक असूनही भाव मिळण्याच्या आशेने शेतकरी मशागत करून दर्जेदार बियाण्यांचा वापर करून लागवड करीत आहे. महागड्या औषधाची वापर करूनही भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मशागत, लागवड, काढणी, बाजारपेठेपर्यंत टोमॅटो विक्रीपर्यंत जाण्यासाठी सरासरी ७० हजार रुपये खर्च येत आहे. होळ, सस्तेवाडी, आठ फाटा, चौधरवाडी, पळशी परिसरात सरासरी ५०० एकरांवर लागवड केली आहे. वडगाव निंबाळकर- मातीमोल भाव मिळत असल्याने टोमॅटो फडात पडून आहे. यातून लागवडीचा खर्च निघणार नाही, इतकी भयानक स्थिती आहे. शेतकरी हे हडपसर येथील शेवाळवाडी मार्केटला संपूर्ण टोमॅटो विक्रीसाठी पाठवतात. चांगल्या बाजारभावाच्या दृष्टीने शेवाळवाडी मार्केटला टोमॅटोला भाव मिळत असतो. परंतु टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने बाजारभाव गडगडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोटींचा फटका बसला आहे. परराज्यात विक्री होळ, सस्तेवाडी, आठ फाटा, चौधरवाडी, पळशी गावांतील टोमॅटो हे पीक मोठमोठ्या मेट्रोसिटीसह पुणे, मुंबई, सोलापूर, बेंगलोरसह परराज्यात विक्रीसाठी जात आहे. या गावांमध्ये एकूण चारशे ते पाचशे एकर शेती टोमॅटोची केली जाते. शेतकरी टोमॅटो पीक घेण्यामध्ये अतिशय पारंगत असून नियोजनबद्ध कामे करीत आहे. दर्जेदार रोपांची लागवड करून मोठ्या प्रमाणात भरघोस उत्पादन घेतले जाते. या चार गावांतील ४० टक्के टोमॅटोची विक्री पुणे- पिंपरी शहरात होते. दागिने गहाण, उसनवारीतून पीक काही शेतकरी टोमॅटो या पिकाला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने सोने गहाण ठेवून तसेच हातउसने रक्कम घेऊन शेती करीत आहेत. काही शेतकरी सोसायटी, राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज घेऊन शेतीची टोमॅटोचे उत्पादन घेत आहे. परंतु कुठल्याच शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यंदा उत्पादन कवडीमोल बाजारभावात विक्री करावी लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. “दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी टोमॅटोचे पीक घेतले आहे. परंतु टोमॅटो पिकाची मोठ्या प्रमाणे आवक होत असल्याने आम्ही पिकवलेल्या चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला देखील कवडीमोल भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जबाजारीला सामोरे जावे लागणार आहे.” – संजय गणपत सस्ते,