कराडमधील व्यक्तीची चार लाखांची फसवणुक, एकाला अटक : साथीदार महिला फरार
जळोची, -इंदापूर येथील तोतया पत्रकाराला बारामती पोलिसांनी दणका दिला आहे. ऑनलाइन चारचाकी खरेदी प्रकरणी उमरज (ता. कराड ) येथील व्यक्तीची चार लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी या तोतया पत्रकाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्याची साथीदार महिला फरार झाली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांनी मंगळवारी (दि. 17) पत्रकारपरिषदेत दिली.
मच्छिंद्र कदम (वय 31, मूळ रा. काटी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद, सध्या रा. देसाईवस्ती, बेलवाडी, ता. इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पत्रकाराचे तर प्रियांका पांडूरंग जाधव (रा. एमआयडीसी, बारामती) असे फरार झालेल्या त्याच्या साथीदार महिलेचे नाव आहे.
तर वैभव सदाशिव लाटे (रा. भवानीपेठ, उमरज, ता. कराड जि. सातारा) यांनी फिर्याद दिली होती. मिलिंद मोहिते म्हणाले की, वैभव यांनी 5 ऑगस्ट रोजी ओएलएक्स ऍपवर जुनी कार खरेदीसाठी जाहिरात पाहिली. त्यानुसार एक कार त्यांना पसंत पडली. दिलेल्या क्रमांकावर त्यांनी संपर्क केला असता कदम त्यांच्याशी बोलले.
कदमने स्वत: पत्रकार-संपादक असल्याचे सांगितले. तुम्ही बारामतीत प्रत्यक्ष येवून मोटार पहा असे त्याने सांगितले. त्यानुसार शुक्रवारी (दि. 13) फिर्यादी वैभव यांचे भाऊ डॉ. विक्रांत, मित्र राजकुमार जाधव यांच्यासह बारामतीत आले. यावेळी कदम यांनी बारामती बसस्थानकासमोर त्यांची भेट घेत कार (एमएच13, डीएल-7333) दाखवली. मोटारीतून शहरातून फेरफटका मारला.
कारची कागदपत्रे पाहिली असता ती प्रियंका पांडूरंग जाधव (रा. वरलेगाव, ता. दक्षिण सोलापूर) या नावे दिसून आले. ती माझी पत्नी असून तिच्या लग्नापूर्वीच्या नावावर मोटार असल्याचे त्याने सांगितले. पाच लाख रुपयांत मोटारीचा व्यवहार ठरला. त्यातील चार लाख रुपये
आरटीजीएसद्वारे तर एक लाख रुपये मोटारीची एनओसी ताब्यात मिळाल्यावर देण्याचे ठरले. त्यानुसार भिगवण रस्त्यावरील स्टेट बॅंकेतील शाखेतून जाधव यांच्या खात्यात फियार्दीने चार लाख रुपये पाठवले. नोटरी करण्यासाठी ते एका ठिकाणी थांबले असताना कदम हा घरी जावून पत्नीला घेवून येतो, असे सांगून गेला. तो परत आलाच नाही.
त्याच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधल्यावरही त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फियार्दीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेत तातडीने हालचाल केली. महेश कदम याला अटक केली.
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, उपनिरीक्षक गणेश निंबाळकर, सहाय्यक फौजदार शिवाजी निकम, बापू बनकर, दशरथ इंगोले, तुषार चव्हाण, अकबर शेख, सुनील कोळी, चैतन्य पाटील यांनी ही कामगिरी केली.