Baramati Court: बारामती न्यायालयात मोठा निर्णय! ‘त्या’ २२ आंदोलकांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
Baramati Court: सन २०१४ मधील नीरा-बारामती मार्गावरील रास्ता रोको आंदोलन प्रकरण; बारामती प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल मराठे यांचा निकाल.

Baramati Court – धनगर समाज आरक्षण आंदोलन प्रकरणातील २२ आंदोलकांची येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी अमोल मराठे यांनी निर्दोष मुक्तता केली. सन २०१४ मध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर तीव्र आंदोलन सुरू होते. त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पणदरे परिसरातील २२ आंदोलनकर्त्यांविरुद्ध वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात आरोपींनी नीरा–बारामती मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक अडवली. परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केली तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्याने तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी बारामती येथील न्यायालयात झाली.
खटल्यादरम्यान सरकार पक्षाच्या साक्षीदारांची सविस्तर तपासणी करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, साक्षीपुरावे व उपलब्ध कागदपत्रांचा विचार करून न्यायालयाने सरकार पक्षाला आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याचे नमूद केले. परिणामी, सबळ व विश्वासार्ह पुराव्याअभावी आप्पासाहेब कोकरे, ज्ञानेश्वर कोकरे, रंजन कोकरे, डॉ. महेश कोकरे,
सर्जेराव कोकरे, रंजीत कोकरे, नितीन कोकरे, प्रमोद कोकरे, पांडुरंग कोकरे, अशोक कोकरे, आप्पासो सुळ, तानाजी सुळ, संदीप कोकरे, महादेव कोकरे, बलदेव कोकरे, दत्तात्रय कोकरे, नारायण कोकरे, विश्वास कोकरे, बबन घोडके, रामभाऊ कोकरे, अशोक कोकरे, बापूराव कोकरे,या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.





