Baramati By Election : सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय, मात्र ‘त्या’ बॅनरने वेधले बारामतीकरांचे लक्ष
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत (Baramati By Election) राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भक्कम आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

Baramati By Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत (Baramati By Election) राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भक्कम आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना अभूतपूर्व मताधिक्य मिळाले असून, त्यांच्या विजयानंतर बारामतीत आनंदोत्सवाचे वातावरण आहे.
विक्रमी मताधिक्य
एकूण २ लाख २३ हजार ७०५ मतदारांनी मतदान केले. यापैकी सुनेत्रा पवार यांना २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली. त्यांनी आपल्या २२ प्रतिस्पर्ध्यांना केवळ काही हजार मतांवर रोखत भारतातील सर्वाधिक मताधिक्य (Baramati By Election) मिळवण्याचा नवा रेकॉर्ड केला. विरोधातील सर्व २२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
बॅनरबाजी आणि सोशल मीडियावर चर्चा
विजयानंतर बारामतीमध्ये अनेक ठिकाणी गुलाल उधळण्यात आला. मात्र, बारामती शहरातील क्रीडा संकुलाजवळील चौकात लावण्यात आलेल्या एका बॅनरने मोठी चर्चा निर्माण केली आहे.
काय लिहिले बॅनरवर?
विशाल पोपटराव जाधव मित्रपरिवार यांनी लावलेल्या या बॅनरवर लिहिले आहे – “निवडणूक आज असो, पाच वर्षांनी असो, वा १० वर्षांनी.. आम्ही बारामतीकर फक्त त्यांच्याच मागे उभे राहणार ज्यांच्या नावात अजितदादा पवार हे नाव असेल. आदरणीय वहिनी साहेब अभिनंदन!”
निवडणुकीची पार्श्वभूमी
बारामती विधानसभा पोटनिवडणूक (Baramati By Election) २३ एप्रिल रोजी झाली होती. यात ५८ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कोणताही उमेदवार दिला गेला नव्हता. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात २२ अपक्ष उमेदवार मैदानात होते, मात्र त्यापैकी कोणत्याही राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा उमेदवार नव्हता.
प्रचारात फार मोठ्या जाहीर सभा घेण्यात आल्या नाहीत. सुनेत्रा पवार यांनी प्रचाराची सुरुवात आणि समारोप सभा यावरच समाधान मानले. या निवडणुकीला दिवंगत अजित पवार यांना मातृरूपी श्रद्धांजली अर्पण करण्याचे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांनी केले होते. बारामतीकरांनी या आवाहनाला भरघोस प्रतिसाद देत अजित पवार यांच्याप्रती असलेली निष्ठा मतपेटीतून दाखवली.






