Baramati By Election: बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ होणार नाही! सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा
Baramati By-election: बारामतीसोबतच राहुरी विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर भाजप कर्डिले यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

Baramati By Election: बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल ही तारीख जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी स्पष्ट केले की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार उभा करण्याचा प्रश्नच येत नाही. “आम्ही सुनेत्रा वहिनींविरोधात कधीही उमेदवार देणार नाही. महाविकास आघाडीही असेच करेल,” असे सुळे यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जानेवारी महिन्यात विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जागेवरून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणार असल्याचे जवळपास निश्चित आहे, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्या विधानसभेवरही निवडून आलेल्या नसल्याने घटनात्मक तरतुदीनुसार सहा महिन्यांच्या आत त्यांना निवडणूक जिंकणे आवश्यक आहे.
बारामतीचा इतिहास –
बारामती हा अजित पवार यांचा बालेकिल्ला होता. त्यांनी या जागेवर सलग आठ वेळा विजय मिळवण्याचा विक्रम केला होता. सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या चुलत बहीण आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली होती. मात्र युगेंद्र पवार एक लाखांहून अधिक मतांच्या फरकाने पराभूत झाले होते.
फडणवीस यांनीही व्यक्त केली बिनविरोधाची आशा –
रविवारी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगरमध्ये बोलताना बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवरील पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आशा व्यक्त केली होती. “या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र निवडणूक लढवण्याची वेळ आलीच तर आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढण्यास तयार आहोत,” असे ते म्हणाले.
राहुरीतही पोटनिवडणूक –
बारामतीसोबतच राहुरी विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर भाजप कर्डिले यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्याची शक्यता आहे.





