“बारामतीमध्ये बोगस मतदान, मतदान केंद्रावर दमदाटी” ; युगेंद्र पवार यांच्या आईचा मोठा दावा

Baramati Assembly Constituency । संपूर्ण देशाचं लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर लोकसभा निवडणुकीतही काट्याची लढाई झाली होती. त्यानंतर आता विधानसभेलाही पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत आहे.
अजित पवार यांच्याविरोधात सख्ख्या भावाचा मुलगा युगेंद्र पवार हा शरद पवारांच्या पक्षाकडून रिंगणात आहे. लोकसभा निवडणुकीलाही युगेंद्र पवार आणि श्रीनिवास पवारांनी सुप्रिया सुळे यांनाच पाठिंबा दिला होता. दरम्यान , आता बारामतीतून मोठी बातमी समोर येत आहे.
बारामतीमध्ये दमदाटी करून बोगस मतदान करण्यात येत असलेला आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी केला आहे. याविषयी बोलताना शर्मिला पवार यांनी माझ्यासमोर एका व्यक्तीनं मतदान केंद्रावर दमदाटी केली. तो जणूकाही स्वत:च्या घरचं लग्न असल्यासारखं या, बसा वगैरे सांगत होता. खाणाखुणा करून मतदारांशी बोलत होता. काय संकेत देत होता माहिती नाही. आम्ही आक्षेप घेतला आणि असं न करण्याची विनंती केली. आमचा मोहसीन त्यांना तेच सांगत होता. पण त्याला त्यांनी धमकी दिली. मग पोलिसांनी त्यांना लगेच बाहेर काढलं. पोलिसांचं सहकार्य होतं. मग मी बाहेर आले. तिथे गेटच्या बाहेर आतल्या व्यक्तीचा मोठा भाऊ म्हणाला, “तुला मी बघून घेईन”.. ते कुणाचे कार्यकर्ते होते माहिती नाही, पण नक्कीच घड्याळाचे होते हे मी सांगू शकते. मी याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत आहोत. आता ते सीसीटीव्ही फूटेज डिलीटही केलं जाण्याची भीती आम्हाला वाटत आहे” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शर्मिला पवार यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत . त्यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना शर्मिला पवार यांनी केलेले आरोप हे धादांत खोटे असून माझा माझ्या कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले. तसेच तक्रार दाखल झाली असेल तर पोलीस यावर कारवाई करतील असेही त्यांनी यावेळी म्हटले.





