Pune District : सभापतीपदी बापूराव खळदकर, तर उपसभापतीपदी बंडगर

पारगाव : कर्मयोगी सुभाषआण्णा कुल प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी शिक्षक समितीचे अध्यक्ष बापूराव चंद्रकांत खळदकर यांची तर उपसभापतीपदी महादेव श्रीमंत बंडगर यांची निवड करण्यात आली आहे. सभापती पदासाठी बापूराव चंद्रकांत खळदकर आणि बाळासाहेब त्रिंबक थोरात या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
पदाधिकारी आणि सदस्यांनी निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडावी, यासाठी प्रयत्न केले; मात्र, तो प्रयत्न निष्फळ ठरला. त्यामुळे गुप्त मतदानाद्वारे निवड प्रक्रिया पार पडली. मतदानात बापूराव खळदकर यांना ११ मते, तर बाळासाहेब थोरात यांना ३ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खळदकर यांना विजयी घोषित केले. उपसभापती पदासाठी महादेव श्रीमंत बंडगर यांनी एकमेव अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे आणि शितोळे यांनी घोषित केले.
निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचा फुलांच्या हारांनी आणि शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
भीमा पाटसचे संचालक विकास शेलार व शिक्षक नेते राजू आत्तार यांनी सर्वांना मागदर्शन केले. यावेळी माजी सभापती शांताराम जगताप, माजी उपसभापती शंकर भुजबळ, संचालक मंडळ, शिक्षक बांधव आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित सभापती बापूराव खळदकर आणि उपसभापती महादेव बंडगर यांनी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे, संचालक मंडळाचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “शिक्षक बांधवांच्या हितासाठी, संस्थेच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक पारदर्शकतेसाठी आम्ही एकदिलाने काम करू. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेला नवा उर्जा आणि दिशा देण्याचा आमचा प्रयत्न असेल.” असे त्यांनी सांगितले.





