दीपक मारटकर खूनप्रकरणात बापू नायरला अटक

पुणे – युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खून प्रकरणात सोमवारी गुंड बापू ऊर्फ प्रभाकर नायर (रा. इंदिरानगर) याला येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन फरासखाना पोलिसांनी अटक केली.
बापू नायर याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात होता. आजारी असल्याने त्याला काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याच्या साथीदारांनी भेट घेतली होती. यावेळी दीपक मारटकर यांचा खुनाचा कट रचण्यात आल्याचे तपासातून समोर आले.
मारटकर खूनप्रकरणी फरासखाना पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांना अटक केली असून, त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली. बापू नायर याच्या अटकेचे वॉरंट पोलिसांनी न्यायालयातून प्राप्त केले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
गुंड नायर हा टोळी प्रमुख असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलीस बंदोबस्त असताना नायर याला आरोपी भेटल्याने त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या 6 कोर्ट कंपनी कर्मचाऱ्यांना नुकतेच निलंबित करण्यात आले आहे.




