हर्षोल्हासात बाप्पांचे आगमन; घरोघरी प्रतिष्ठापना, स्वागतासाठी अवघे पुणे शहर सजले

पुणे -“गणपती बाप्पा मोरया…’चा नादघोष मंगळवारपासून पुढचे दहा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात घुमणार असून, श्रींची प्रतिष्ठापना प्रत्येक घरात, सार्वजनिक मंडळांतर्फे करण्यात येणार आहे. महिनाभरापासूनची सजावटीची तयारी आता पूर्ण झाली आहे. दरम्यान, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच मंगळवारच्या अंगारक योगावर आलेल्या गणेश चतुर्थीला मुहूर्तावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
मधूर सुरांचे वादन करणारे बॅंडपथकातील वादक कलाकार, पारंपरिक पेहरावातील कार्यकर्ते, आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथात विराजमान सर्वांगसुंदर गणराय आणि ढोल-ताशांचा निनाद अशा उत्साही वातावरणात मंगळवारी लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त आणि नागरिक सज्ज झाले आहेत.
गणेशोत्सवाची सारेच आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा श्रावण महिना अधिक आल्यामुळे गणरायाचे आगमन महिनाभराच्या उशिराने होत असले, तरी आता प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. यावर्षी पुरेसा पाऊस झाला नसल्याने धरणे भरली नसली तरी हे विघ्न गणराय दूर करतील ही श्रद्धा बाळगून सारे गणरायाच्या आगमनासाठी उत्सुक झाले आहेत. मंगळवारी शुभ मुहूर्तावर घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य भागात श्री गणेशाची स्थापना करावी.
घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना ही सकाळी लवकर करावी सूर्योदयापासून सकाळी 11 वाजेपर्यंतचा काळ मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी अत्यंत शुभ आहे. यातही सकाळी साडेसहा ते नऊ हा कालावधी सर्वोत्तम आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शक्यतो दुपारी एक वाजून 43 मिनिटांपर्यंत गणेश स्थापना करावी, अशी माहिती पंडित वसंतराव गाडगीळ यांनी दिली.
गणरायाच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त
घरातील परंपरेनुसार दीड, तीन, पाच, सात, दहा जितके दिवस गणपती असेल तितके दिवस दररोज सकाळ-संध्याकाळ बाप्पांची मनोभावे पूजा आणि आरती करून बाप्पांना नैवेद्य दाखवावा. अनेक ठिकाणी अर्ध्या दिवसाचा गणपती असतो. या गणपतींचे विसर्जन मंगळवारी (दि. 19) सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर करावे, असे पंडित वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले.





