Dahi Handi 2026: दहीहंडीवर ‘बापट इफेक्ट’; डीजेऐवजी ढोल-ताशांना पसंती
Dahi Handi 2026: ध्वनी प्रदूषणाविरोधातील जनजागृतीचा परिणाम; काही मंडळांकडून ‘चार बेस, चार टॉप’च्या मर्यादेचे पालन

पुणे : ध्वनी प्रदूषणाविरोधात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जनजागृतीचा परिणाम यंदाच्या दहीहंडी उत्सवात दिसून आला. शहरातील अनेक दहीहंडी मंडळांनी डीजेऐवजी पारंपरिक ढोल-ताशा पथकांना पसंती दिल्याने विविध भागांत ढोल-ताशांचा गजर अधिक प्रमाणात ऐकायला मिळाला. काही मंडळांनी डीजेचा वापर केला असला, तरी ध्वनीची तीव्रता तसेच ध्वनीवर्धकांची संख्या मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी गेल्या काही दिवसांपासून ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. सार्वजनिक उत्सवांमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजविणे, ध्वनीवर्धकांचा अतिरेक आणि त्याचा ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण तसेच नागरिकांना होणारा त्रास याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
उत्सव साजरे करण्यास विरोध नसून, ध्वनीची मर्यादा पाळून उत्सव साजरा करावा, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या या भूमिकेची शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. दरम्यान, पुणे पोलिसांनी दहीहंडी तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाबाबत मंडळांना सूचना दिल्या आहेत.
ध्वनीवर्धकांची संख्या निर्धारित मर्यादेत ठेवण्याबरोबरच आवाजाची पातळी नियमांनुसार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवात काही मंडळांनी डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
हेही वाचा:





