ग्रामस्वच्छता अभियानात पुणे विभागात बनवडी प्रथम

सातारा – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2020- 21 व 2021- 22 मध्ये पुणे विभागामध्ये बनवडी (ता. कराड) ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकवला आहे. या यशाबद्दल विविध क्षेत्रातून ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जिल्ह्याने पाणी व स्वच्छतेमध्ये राज्यातच नव्हे तर देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या योगदानात ग्रामपंचायतीही मागे नसून अनेक ग्रामपंचायती विविध उपक्रम राबवून आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. बनवडी ग्रामपंचायतीचा घनकचरा प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक आहे. जिल्ह्यातील अनेक गावांनी व राज्यातील अनेक जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी या प्रकल्पास भेट दिली आहे. या प्रकल्पाचा आदर्श घेऊन अनेक गावांनी अशा पध्दतीचे घनकचरा प्रकल्प उभे केले आहेत.
गांडूळ खतापासून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळत असून चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजना, सौर उर्जेद्वारे तयार होणाऱ्या विजेवर पाणीपुरवठा योजना चालवून अन्य ग्रामपंचायतींपुढे वेगळेपण दाखवून दिले आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात ही ग्रामपंचायत प्रथम आली होती. आता पुणे विभागात प्रथम येऊन जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा बनवडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रोवला गेला आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील या यशाबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभुते, ग्रामपचांयतीचे सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच नरहरी जानराव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर शिवदास, जिल्हा तज्ज्ञ व विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी अभिनंदन केले आहे.





