Bank Holiday : बँक ग्राहकांनो, 25 सप्टेंबरपूर्वी काम उरका! 26 ते 30 सलग 5 दिवस बँक शाखा बंद राहण्याची शक्यता
Bank Holiday : २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान बँक युनियन्सच्या देशव्यापी संपामुळे २६ ते ३० सप्टेंबर सलग ५ दिवस शाखा बंद राहण्याची शक्यता आहे. जाणून घ्या UPI, एटीएम आणि ऑनलाइन बँकिंगवर काय परिणाम होणार.

Bank Holiday : बँकेत जाऊन महत्त्वाचे काम करायचे असेल तर ग्राहकांनी ते आधीच उरकणे गरजेचे आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यापूर्वी २६ सप्टेंबरला चौथा शनिवार आणि २७ सप्टेंबरला रविवार असल्याने, संप झाल्यास बँक शाखा सलग पाच दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.
या संपामुळे बँकांच्या सहामाही कामकाजावरही परिणाम होऊ शकतो. पाच दिवस बँक शाखांमध्ये प्रत्यक्ष सेवा उपलब्ध नसल्याने ग्राहकांना नियोजित कामे आधीच पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बँक कर्मचारी संपावर का जाणार?
बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, ही UFBUची प्रमुख मागणी आहे. शनिवारी आणि रविवारी बँकांना सुट्टी देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पेन्शनमध्ये सुधारणा, सर्व पेन्शनधारकांसाठी समान महागाई भत्ता (DA) सूत्र आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (OPS) स्वीकारण्याचा पर्याय देण्याची मागणीही आहे.
याच मागण्यांसाठी बँक युनियन्सने यापूर्वी ११ सप्टेंबरलाही देशव्यापी एकदिवसीय संप केला होता.
सरकारकडून पर्यायी व्यवस्था
संपामुळे ग्राहकांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी वित्तीय सेवा विभागाकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली जात आहे. संपाच्या काळात आवश्यक बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.
SBI, युनियन बँकेकडून ग्राहकांना सूचना
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यासह काही बँकांनी ग्राहकांना आधीच सूचना दिल्या आहेत. शाखेशी संबंधित महत्त्वाची कामे २६ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रोख रकमेची गरज असल्यास एटीएम किंवा डिजिटल बँकिंगचा वापर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
UPI, एटीएम आणि ऑनलाइन बँकिंग सुरू राहणार?
बँक शाखांवर संपाचा परिणाम झाला तरी डिजिटल आणि स्वयंचलित सेवा सुरू राहण्याची शक्यता आहे. UPIद्वारे पैसे पाठवणे, एटीएममधून पैसे काढणे, तसेच इंटरनेट आणि मोबाइल बँकिंगद्वारे व्यवहार करता येतील. मात्र, शाखेत जाऊन पासबुक अपडेट करणे, धनाकर्ष (ड्राफ्ट) काढणे किंवा प्रत्यक्ष चेक जमा करणे यासारख्या कामांवर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे बँक शाखेत करायचे महत्त्वाचे काम असल्यास २५ सप्टेंबरपूर्वीच ते पूर्ण करून घेणे सुरक्षित ठरेल. संपाच्या कालावधीत डिजिटल व्यवहारांसाठी UPI, मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगचा वापर करता येईल.





