Bank Of Maharashtra: महाराष्ट्र बॅंकेडून सवलतीत कर्ज पुरवठ्याची योजना

पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रने दिनांक 1 ऑगस्ट 2022 पासून ग्राहकांसाठी रिटेल बोनान्झा द्वारे धमाकेदार मान्सून ऑफर देऊ केली आहे. महासुपर गृहकर्ज योजना व कार वाहन कर्ज योजनेवरील प्रक्रिया शुल्क बॅंकेने माफ केले आहे. या योजनेद्वारे सणासुदीच्या काळात ग्राहकांचा आनंद द्विगुणीत करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, असा अभिप्राय बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए एस राजीव यांनी नोंदविला.
ग्राहकांनी कमी झालेले व्याजदर आणि शून्य प्रक्रिया शुल्क अशा सवलतींचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए बी विजयकुमार, आशिष पांडे यांनी सांगितले. बॅंकेने वार्षिक 7.30 % व्याजदराने गृहकर्ज व 7.70 % व्याजदराने कार खरेदी करण्यासाठी कर्ज देऊ केले आहे. गृहकर्जाचे सर्व सामिकृत मासिक हप्ते नियमितपणे परतफेड केल्यास तीन हप्त्यांची सवलत, गृहकर्ज व कार वाहनाच्या खरेदीसाठी एकूण किमतीच्या 90 % पर्यंत कर्ज, कर्ज रक्कम नियत कालावधीच्या अगोदर पूर्णपणे किंवा अंशतः परतफेड केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.
बॅंकेने वार्षिक 7.70 % व्याजदराने रु 25.00 लाख रकमे पर्यंत सोने कर्ज योजना सुरु केली असून रु 3.00 लाख कर्जापर्यंत कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार नाही. फक्त 15 मिनिटात सोने कर्ज मंजूर करण्यासाठी बॅंकेने आपल्या प्रत्येक शाखेत सोने कर्ज देण्यासाठी एक समर्पित कक्ष सुरु केला आहे.




