Bangladesh : बांगलादेशी लष्करी अधिकाऱ्याकडून भारताला धमकी

Bangladesh – बांगलादेशाचे माजी लष्करी अधिकारी आणि विद्यमान मुख्य सल्लागार डॉ. मुहम्मद युनूस यांचे निकटचे सहकारी मेजर जनरल (निवृत्त) एएलएम फजलूर रहमान यांनी भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या संबंधांबाबत विचित्र वक्तव्य केले आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला, तर बांगलादेशाने चीनबरोबर मिळून भारताची इशान्येकडील राज्ये ताब्यात घ्यावीत, असे मे.जन. रहमान यांनी सुचवले आहे.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी हा प्रस्ताव बांगलादेश सरकारपुढे मांडला आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यापासून बांगलादेशातील हंगामी सरकारने मात्र फारकत घेतली आहे.
मंगळवारी फेसबुकवर बंगालीमध्ये केलेल्या पोस्टमध्ये रहमान यांनी हा प्रस्ताव सुचवला आहे. जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास बांगलादेशने भारताची इशान्येकडील ७ राज्ये ताब्यात घ्यावीत, त्यासाठी बांगलादेशने आतापासूनच चीनशी सल्लामसलत करायला सुरुवात केली पाहिजे, असे देखील त्यांनी सुचवले आहे.
२००९ च्या बांगलादेश रायफल्स बंडातील हत्याकांडांची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या राष्ट्रीय स्वतंत्र आयोगाचे अध्यक्ष म्हणून डिसेंबर २०२४ मध्ये रहमान यांची नियुक्ती युनूसच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने केली आहे. त्यांच्या वक्तव्याविषयी हंगामी सरकाने मात्र असहमती दर्शवली आहे.
या टिप्पणीमध्ये बांगलादेश सरकारची भूमिका किंवा धोरणाचे प्रतिबिंब नाही आणि म्हणूनच, सरकार कोणत्याही स्वरूपात अशा वक्तव्याचे समर्थन करत नाही, असे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे.
तसेच रहमान यांच्या वक्तव्यावर सरकारमधील कोणीही प्रतिक्रिया देऊ नये, अशी सूचनाही बांगलादेशातील हंगामी सरकारने सर्व संबंधितांना केली आहे.बांगलादेश सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता, परस्पर आदर आणि सर्व राष्ट्रांच्या शांततापूर्ण सहअस्तित्वाच्या तत्त्वांशी दृढपणे वचनबद्ध आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
युनूस यांचे देखील वादग्रस्त वक्तव्य
मार्चच्या सुरुवातीला, मुख्य सल्लागार युनूस यांनी चीनच्या भेटीच्यावेळी देखील अशीच वादग्रस्त टिप्पणी केली होती. जवळजवळ १,६०० किमी सीमा असलेल्या भारताच्या सात ईशान्येकडील राज्यांनी बांगलादेशला वेढले आहे आणि बांगलादेशशिवाय या ७ राज्यांना समुद्रापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नाही, असे ते म्हणाले होते.
हिंद महासागराचा बांगलादेश हा एकमेव तारणहार असल्याचे देखील युनूस चीनमधील व्यवसायिकांच्या एकत्रीकरणामध्ये म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. भारताने बांगलादेशला दिलेली ट्रान्सशिपमेंट सुविधा रद्द केली.
बांगलादेशातून पश्चिम आशिया, युरोप आणि अन्य देशांना जलमार्गाने निर्यात करताना भारतीय बंदरांचा वापर करण्याची ही सुविधा होती. ही सुविधा रद्द झाल्याने बांगलादेशला पर्यायी जलमार्गांचा वापर करावा लागतो आहे.





