बांग्लादेशच्या पंतप्रधान हसीना शेख यांचा राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांग्लादेशमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढला आहे. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामध्ये आतापर्यंत जवळपास ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. बांग्लादेशमध्ये सत्तापालटाचे वारे वाहू लागले असून पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्या राजधानी ढाका सोडून सुरक्षित ठिकाणी गेल्या आहेत. यामुळे आता बांगलादेशमध्ये लष्करी राजवट लागू होण्याची शक्यता आहे.
शेख हसीना यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की, शेख हसीना या त्यांच्या बहिणीसोबत गणभवन सोडून सुरक्षित ठिकाणी गेल्या आहेत. देशवासियांसाठी त्यांना एक भाषण रेकॉर्ड करायचं होतं पण त्यांना संधी मिळाली नाही. बांगलादेशमधील जनतेने लाँग मार्च टू ढाकामध्ये भाग घेण्याचं आवाहन केल्यानंतर सरकारने इंटरनेट बंद केलं होतं. त्याआधी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आंदोलक आणि सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांमध्ये झटापट होऊन या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.
गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान सरकारनं प्रथमच असं पाऊल उचललं आहे. यासोबतच सोमवारपासून तीन दिवसांची सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. बांगलादेशात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यादरम्यान, शेजारील देशात हिंसाचाराच्या ताज्या घटना लक्षात घेऊन भारताने देखील रविवारी रात्री बांगलादेशमध्ये राहणाऱ्या भारतीयांना ‘अत्यंत सावधगिरी’ बाळगण्याचा आणि आपल्या हालचाल मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. भारताने आपल्या नागरिकांना पुढील आदेश मिळेपर्यंत बांगलादेशला न जाण्यास सांगितलं आहे.





