Bangladesh Violence: भारताने बांगलादेशमध्ये हस्तक्षेप करू नये ! जमात-ए-इस्लामीच्या प्रमुखाचा इशारा

Bangladesh Violence – बांगलादेशला भारताबरोबर सौहार्दाचे संबंध हवे आहेत. मात्र भारताने बांगलादेशच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करता कामा नये, असे बांगलादेश जमात-ए-इस्लामीचे प्रमुख शफिकूर रेहमान यांनी म्हटले आहे.
रेहमान हे बांगलादेश जमात-ए-इस्लामीचे आमीर आहेत. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आपल्या पक्षाला भारताबरोबर निकटचे संबंध हवे आहेत.
मात्र बांगलादेशला भूतकाळातील घटना मागे सोडून अमेरिका, पाकिस्तान आणि चीनबरोबर देखील जवळचे आणि समतोल संबंध जपायचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.
जमात-ए-इस्लामीला भारतविरोधी समजणे चुकीचे आहे. जमात-ए-इस्लामी कोणत्याही देशाच्या विरोधात नाही. मात्र बांगलादेशच्या बाजूने आहे. जमात-ए-इस्लामीबाबतचा हा दृष्टीकोन बदलण्याची आवस्यकता आहे, असेही रेहमान म्हणाले.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या भारतात पळून गेल्या नसत्या तर अधिक चांगले झाले असते. त्यांनी कायद्याला सामोरे जाण्यासाठी बांगलादेशात परत यायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी केली.
एकमेकांच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप न करताही द्विपक्षीय संबंध सहकार्याचे आणि परस्परंच्या हितांचे ठेवले जाऊ शकतात. भारताबरोबर बांगलादेशची जमिनीवरील आणि सागरी सीमाही जोडलेली आहे. त्यामुळे भारताशी चांगले संबंध आम्हाला हवेच आहेत, असे रेहमान म्हणाले.
भाराने पूर्वी केलेल्या काही कृती बांगलादेशच्या जनतेला न रुचणाऱ्या आहेत. बांगलादेशात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय अधिकारी ढाक्यात आले आणि कोणी निवडणूक लढवावी, कोणी लढवू नये असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळेच भारताबाबतच्या परराष्ट्र धोरणाचे फेरमूल्यांकन करावे लागले होते, असेही रेहमान म्हणाले.





