बांगलादेश घालणार ‘जमात ए इस्लामी’ संघटनेवर बंदी

ढाका – बांगलादेशातल्या आंदोलनात हिंसाचार घडवून आणल्याच्या आरोपाखाली जमात ए इस्लामी या कट्टरवादी संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
आंदोलन शांततेने सुरू असताना जमात ए इस्लामी आणि बांगलादेश नॅशनल पार्टीशी संबंधित विद्यार्थी संघटनांनी हिंसाचाराला सुरूवात केली, असा शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील आवामी लीग सरकारचा आरोप आहे. आज आवामी लीग आणि अन्य १४ पक्षांच्या आघाडीची बैठक झाली. त्यामध्ये जमात ए इस्लामीवर बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला.
जमात ए इस्लामीवर बंदी घालण्याचा निर्णय उद्या जाहीर केला जाईल, असे कायदा मंत्री अंशुल हक यांनी पत्रकारांना सांगितले. या पक्षाची विद्यार्थी शाखा असलेल्या छात्र दलाने गोंधळाची परिस्थिती निर्माण केल्याचे पुरावे मिळाले आहेत, असे कायदा मंत्र्यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना
जमात ए इस्लामीची स्थापना १९४१ साली झाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांच्या राजवटीमध्ये हा पक्ष स्थापन झाला, तेंव्हा तत्कालिन बंगाल प्रांत भारताचा भाग होता.
बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनल पार्टीशी जमात ए इस्लामीचे निकटचे संबंध आहेत. २०१८ साली उच्च न्यायालयाच्या आदेशावरून निवडणूक आयोगाने जमात ए इस्लामीची राजकीय पक्ष म्हणून मान्यता रद्द केली आहे.





