Bangladesh News : बांगलादेशात कपड्यांच्या फॅक्टरीला आग; 16 जणांचा मृत्यू

ढाका : बांगलादेशात कपड्यांच्या एका फॅक्टरीला लागलेल्या भीषण आगीमध्ये किमान १६ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर इतर अनेक जण जखमी झाले आहेत. राजधानी ढाका शहरातील रुपनगर भागातील कपड्यांच्या फॅक्टरी शेजारच्या रसायनांच्या गोदामालाही आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आज आटोक्यात आणल्यानंतर केलेल्या शोधमोहिमेदरम्यान १६ कामगारांचे मृतदेह आढळून आले आहेत.
ही आग शेजारच्या रसायनांच्या गोदामामध्ये लागली असावी आणि तेथून कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये पसरली असावी, असा अंदाज अग्निशामक सेवेच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला आहे. चार मजली कापड कारखान्यातील आग विझवली आहे, परंतु रासायनिक डेपोमधील आग विझवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत, असे या प्रवक्त्याने सांगितले. आगीत १६ जणांचा मृत्यू झाल्याचे अग्निशामक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले असून मृतांची अद्याप ओळख पटवली गेलेली नाही.
या सर्वांचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. जखमींना ढाका येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ बर्न ऍन्ड प्लास्टिक सर्जरीमध्ये दाखल करण्यात आले आहे. रसायनांच्या गोदामातील विषारी वायूमुळे काही जणांचा तात्काळ मृत्यू झाला असावा. या विषारी वायूच्या स्फोटामुळे आग पसरली असावी, असा अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. काही कर्मचारी बेपत्ता असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होते आहे.
यापुर्वीच्या भीषण आगीच्या घटना
२०२१ मध्ये, बांगलादेशातील एका अन्न आणि पेय कारखान्याला आग लागली होती, त्यामध्ये किमान ५२ लोकांचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारी २०१९ मध्ये, ढाक्यातील सर्वात जुन्या भागात अपार्टमेंट, दुकाने आणि गोदामांनी व्यापलेल्या ४०० वर्षे जुन्या परिसरात आग लागली आणि त्यात किमान ६७ लोकांचा मृत्यू झाला होता. २०१२ मध्ये, ढाक्यातील एका कापड कारखान्यात बंद असलेल्या बाहेर पडण्याच्या दरवाजांमागे अडकून सुमारे ११७ कामगारांचा मृत्यू झाला.





