Bangladesh begins Operation Devil Hunt | बांगलादेशमध्ये मागील काही महिन्यांपासून राजकीय अस्थिरता पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला होता. त्यानंतर अंतरिम सरकारची जबाबदारी मोहम्मद युनूस यांच्याकडे आहे. मात्र, पुन्हा एकदा देशात हिंसाचार उफाळला आहे. या पार्श्वभूमीवर आता बांगलादेशच्या सरकारने ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ सुरू केले आहे.
स्थानिक नागरिक आणि शेख हसीना यांच्या विरोधातील विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेत जवळपास 15 विद्यार्थी जखमी झाले. आवामी लीग पक्षाच्या नेत्यांच्या घराची तोडफोड देखील करण्यात आली. त्यामुळे सुरक्षा दलांनी ऑपरेशन डेव्हिल हंट सुरू केले आहे.
विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश गृह मंत्रालयाने कायदा आणि सुव्यवस्था दलांच्या समन्वयाने बैठक घेतली. या बैठकीत संबंधित भागातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर नियंत्रण राखण्यासाठी व दहशतवाद्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी संयुक्त दलांच्या समन्वयाने ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे ऑपरेशन संपूर्ण देशभरात सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून आवामी लीग पक्षाच्या नेत्यांच्या घरावर हल्ले केले जात आहेत. हिंसक निदर्शकांनी वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक ऑनलाइन भाषण दिल्यानंतर ही तोडफोड करण्यात आली. अवामी लीगचे अध्यक्षीय सदस्य शेख सेलीम यांच्या ढाका येथील बनानी येथील घराला देखील आग लावण्यात आली होती.