बांगलादेशात लोकशाहीचा नवा सूर्योदय: हंगामी नेते युनूस यांनी केली मोठी घोषणा, निवडणुका कधी होणार जाणून घ्या?

Bangladesh Election: बांगलादेशात लोकशाहीच्या दिशेने एक नवे पाऊल पडले आहे. बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. हंगामी नेते नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांनी देशात एप्रिल 2026 मध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्तेचा अंत आणि सामूहिक हत्याकांडाच्या आरोपांनंतर युनूस यांनी पारदर्शी आणि निष्पक्ष निवडणुकीचे आश्वासन दिले आहे.
युनूस यांचा देशाला संदेश –
84 वर्षीय मोहम्मद युनूस यांनी दूरदर्शनवर देशाला उद्देशून सांगितले की, “एप्रिल 2026 मध्ये कोणत्याही दिवशी निवडणुका घेतल्या जातील. ही निवडणूक बांगलादेशाच्या इतिहासातील सर्वात प्रामाणिक आणि निष्पक्ष असेल. ही केवळ मतदानाची प्रक्रिया नसून, आंदोलनात शहीद झालेल्या तरुणांच्या आत्म्याला शांती देणारा आणि देशाच्या भविष्याला आकार देणारा क्षण असेल.” युनूस यांनी जनतेला आवाहन केले की, राजकीय पक्षांनी प्रामाणिकपणा, पारदर्शिता आणि भ्रष्टाचारमुक्त शासनाचा वचन द्यावे.
सुधारांना प्राधान्य –
निवडणुकीपूर्वी युनूस यांनी देशाच्या न्यायव्यवस्था, प्रशासन आणि संस्थांमध्ये मोठे सुधार घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे. “ईद-उल-फित्रपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण बदल प्रत्यक्षात दिसतील,” असे त्यांनी सांगितले. यामुळे बांगलादेश पुन्हा पुन्हा राजकीय संकटात सापडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेख हसीनांवर गंभीर आरोप –
2024 मध्ये झालेल्या जनआंदोलनांनंतर शेख हसीना यांना सत्ता सोडावी लागली आणि सध्या त्या भारतात निर्वासित जीवन जगत आहेत. अलीकडेच बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने शेख हसीना आणि इतर दोन व्यक्तींना सामूहिक हत्या आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांखाली दोषी ठरवले आहे.
नव्या बांगलादेशाची आशा –
युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश नव्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांच्या या घोषणेने देशातील जनतेत नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. आता सर्वांचे लक्ष एप्रिल 2026 मधील निवडणुकीकडे लागले आहे, ज्यामुळे बांगलादेशाच्या भविष्याचा मार्ग ठरेल.





