Bangladesh Crisis : यूके ते यूएसए…! बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद…

वॉशिंग्टन – बांगलादेशात हिंदू समुदायावर होत असलेल्या हल्ल्यांचा जगभरातून निषेध व्हायला लागला आहे. अनेक देशांमधील हिंदू समुदायाने या हल्ल्यांचा निषेध करणारी निदर्शने केली असून जागतिक पातळीवरील अनेक नेत्यांनीही या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसच्या बाहेर मोठ्या संख्येने हिंदू समुदायाने बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याचा निषेध करणारी निदर्शने केली. निदर्शकांनी आपल्या बरोबर बांगलादेश आणि अमेरिकेचे ध्वज देखील घेतले होते. बांगलादेशातील हिंदूविरोधी आंदोलनाच्या मुद्यावर अमेरिकेने तातडीने हस्तक्षेप करावा आणि तेथील हिंदूंना संरक्षण देण्यासाठी हंगामी सरकारवर दबाव आणावा, अशी मागणी हिंदू समुदायाकडून केली गेली. या निदर्शनांमध्ये अल्पसंख्य हिंदूंबरोबर मूळ बांगलादेशी, भारतीय-अमेरिकन नागरिकांच्या संघटना, मानवी हक्कविषयक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. या निषेध आंदोलनासाठी वॉशिंग्टन, मेरीलॅन्ड, व्हर्जिनिया आणि न्यूयॉर्क येथून कार्यकर्ते जमा झाले होते.
ब्रिटनमध्ये ब्रिटन संसदेच्या बाहेर देखील हिंदू संघटनांनी निदर्शने केली. बांगलादेशातील हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांचा यावेळी जोरदार निषेध केला गेला. हिंदू लाईव्हज मॅटर आणि वुई वॉन्ट जस्टिस, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
जर्मनीत वास्तव्याला असलेले पाकिस्तानातील सिंध प्रांतातील जय सिंध मुत्ताहिदा महाज नेते शफी मुरपात यांनी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशात परतण्याची विनंती केली आहे. बांगलादेशच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि धार्मिक सौहार्द जपण्यासाठी शेख हसीना यांनी बांगलादेशात लगेच परतणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. बांगलादेशातील हिंदूंनाआणि माजी पंतप्रधान सेख हसीना यांना पाठिंबा देण्यासाठी कॅनडामध्ये टोरांटो येथे हजारो लोकांचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये कॅनडातील हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध आणि ज्यू नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बांगलादेशची लोकसंख्या १७० दशलक्ष असून त्यामध्ये हिंदूंची संख्या ८ टक्के इतकी आहे. शेख हसीना यांच्या सरकारच्या कार्यकाळात हिंदूंना संरक्षण असायचे. मात्र हसीना देशाबाहेर गेल्यावर हिंदूंची घरे, उद्योग आणि मंदिरांवर हल्ले झाले आहेत. लुटालूट आणि जाळपोळीच्या अनेक घटना घडल्यामुळे हिंदू समुदायामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांचा युनूस यांच्याकडून निषेध
बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या हल्ल्यांचा हंगामी पंतप्रधान डॉ. मोहम्मद युनूस यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. देशातील हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध कुटुंबांचे रक्षण करावे, असे आवाहन डॉ. युनूस यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बांगलादेशातील हिंदूसह अन्य अल्पसंख्यांकाच्या रक्षणाची आणि सुरक्षेची अपेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमधून केली होती.





