Bangladesh Crisis : सरकार पडल्यानंतरही हिंसाचार थांबेना, आतापर्यंत 232 जणांचा मृत्यू…

Bangladesh Crisis : बांगलादेशात आरक्षणावरून सुरू झालेला हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर झालेल्या हिंसक घटनांमध्ये आतापर्यंत 232 जणांचा मृत्यू झाला आहे. जुलैच्या मध्यापासून सुरू झालेल्या आरक्षणविरोधी आंदोलनात मृतांची संख्या आता 560 वर पोहोचली आहे. बांगलादेशच्या प्रोथोम अलो वृत्तपत्रानुसार बुधवारीच झालेल्या हिंसाचारात 21 जणांचा मृत्यू झाला. त्यातील काही जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
खरे तर बांगलादेशात स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण दिले जाते, त्याविरोधात विद्यार्थी जूनपासून आंदोलन करत होते. अनेक आठवडे चाललेल्या सरकारच्या विरोधातील निदर्शनादरम्यानच पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन 5 ऑगस्ट रोजी देशातून पळ काढला आणि त्यांची खुर्चीही गेली. पण सरकार पडल्यानंतर निदर्शने आणखी हिंसक बनली, ज्यात 232 लोकांचा मृत्यू झाला आहे.
23 दिवसांत 560 लोकांचा मृत्यू
शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर झालेल्या निदर्शनांमध्ये 232 जणांना जीव गमवावा लागला. त्याच वेळी, 16 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान आरक्षणाच्या निषेधार्थ झालेल्या संघर्षात 328 लोकांचा मृत्यू झाला होता. या दोन घडामोडींदरम्यान, गेल्या 23 दिवसांत एकूण 560 मृत्यूची नोंद झाली आहे. यातील बहुतांश लोकांचा मृत्यू मंगळवारी झाला आहे.
209 कैदी पळाले तुरुंगातून…
मंगळवारी गाझीपूरमधील काशीपूर उच्च सुरक्षा तुरुंगातून सुमारे 209 कैदी पळाले. कैद्यांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी कारागृह सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळीबारही केला. या घटनेत तीन अतिरेक्यांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याचे तुरुंगातील सूत्रांनी सांगितले.
पोलीस कर्मचाऱ्यांकडून कामावर येण्यास टाळाटाळ…
शेख हसीना यांनी देश सोडल्यापासून सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याच्या बातम्या येत असताना, पोलिस त्यांच्या सुरक्षेचे कारण देत कामापासून दूर राहिले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून रस्त्यावर वाहतूक पोलिस नाही. इतर स्वयंसेवी संस्थांचे विद्यार्थी आणि कार्यकर्ते राजधानीच्या रस्त्यांवर वाहतूक पोलिस म्हणून काम करत आहेत. दरम्यान, बुधवारी नवनियुक्त पोलीस महानिरीक्षक मोहम्मद मैनुल इस्लाम यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना 24 तासांच्या आत आपापल्या कामाच्या ठिकाणी परतण्याचे आदेश दिले आहेत.





