विशेष : भारताचा विजयदिन

17 डिसेंबर 1971 या दिवशी पश्चिम पाकिस्तानच्या वसाहतवादी जोखडातून बांगलादेश स्वतंत्र झाला. या युद्धात भारतीय सैनिकांनी विजय मिळविला होता.
डिसेंबर 1970मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष याह्याखान यांनी एकोणीसशे सत्तरच्या डिसेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली. त्यात पूर्व पाकिस्तानात शेख मुजीबूर रहमान यांच्या अवामी पक्षाला 313 पैकी 167 जागा मिळाल्या. अवामी पक्षाला सरकार बनवण्याची संधी मिळणार हे दिसताच याह्याखान यांनी देशात मार्शल लॉ जाहीर केला. हा कायदा केवळ विरोधकांना चिरडण्यासाठीच लादला होता हे उघड होते. लष्करी गव्हर्नर जनरल टिक्काखान यांनी पूर्व पाकिस्तानात अंदाधुंद दडपशाही सुरू केली. याविरुद्ध शेख मुजीब रहमान यांनी दंड थोपटले. 25 मार्च 1971 रोजी त्यांनी स्वतंत्र बांगला देशची घोषणा केली. हे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी रहमान यांना अटक करण्यात आली. पश्चिम पाकिस्तानच्या तुरुंगात त्यांना बंदिवान केले. पण त्यामुळे जनतेमधला असंतोष अधिकच उसळला. लष्कराचे अत्याचार आणखी वाढले. ही तर लोकांच्या मूलभूत हक्काची पायमल्ली होती!
तेथील स्वातंत्र्यप्रेमी जनतेने स्वतः मुक्तीवाहिनी स्थापन केली व या मुक्तीवाहिनी सेनेचे कार्यकर्ते या जुलूमशाहीविरुद्ध लढा देऊ लागले. मग तर सरकारच्या कत्तली, अत्याचार यांना ऊत आला. त्यामुळे इतर देशांनी पाकिस्तानचा निषेध केला. भारत, सोव्हिएत युनियन, जपान आणि युरोपीय देशांनी याह्याखान यांच्या हुकूमशाहीविरुद्ध टीकास्त्र सोडले. पण पाकिस्तान सरकारचे जुलूम थांबेनात. गावोगावची माणसं घाबरली. जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत सुटली. आपली सीमा जवळ असल्याने पूर्व पाकिस्तानातून हजारो माणसांचे लोंढे भारतात घुसू लागले. तो काळ आर्थिकदृष्ट्या भारतासही फारसा अनुकूल नव्हता. गरिबी, बेरोजगारी, आरोग्य अशा अनेक प्रश्नांना भारत त्या वेळी तोंड देत होता. त्यातच हजारो शरणार्थी भारतात आश्रयासाठी येऊ लागल्यावर काहीतरी उपाय शोधणे आवश्यकच होते.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात भाषण करून भारतात येणाऱ्या बांगलादेशी लोकांच्या लोंढ्यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण येतो आहे याकडे जगभरातील नेत्यांचे लक्ष वेधले. त्यामुळे पाकिस्तान सरकार आणखीच चिडले व भारतावर आक्रमण करण्याच्या त्याच्या हालचाली सुरू झाल्या. पश्चिम पाकिस्तान लष्करीदृष्ट्या सुसज्ज झाले. त्यांच्याकडे भरपूर रणगाडे व विमाने होती. आपल्या गुप्तचर संस्थेच्या संशोधन आणि विश्लेषण विभाग, म्हणजेच “रॉ’, या सर्व घडामोडींची गंभीरपणे नोंद घेत होता. एक्काहत्तरच्या जुलैमधेच आपल्या सैन्याला युद्धसज्ज होण्याचा इशारा मिळाला. 1 डिसेंबरला रात्री अकरा वाजता भारत सरकारला पक्की माहिती मिळाली की, पाकिस्तान आपल्या पश्चिम सीमारेषेवर हल्ले करणार आहे. त्याप्रमाणे 3 डिसेंबर 1971 या दिवशी हलवारा आणि इतर ठिकाणी पाकिस्तानने हल्ले केले. पहिल्याच दिवशी त्यांनी भारताच्या पूर्ण गुरखा बटालियनला पकडलं. आपली दोन विमानं त्यांनी पाडली. मात्र, भारत आक्रमक झाला. दहा हजार फूट उंचीवरून पाच हजार किलो बॉम्ब पाकिस्तानातील डेराबाबा नानक येथे भारतीय सैन्याने टाकले. असे बॉम्ब टाकताना त्या लढाऊ विमानाचा वेग ताशी नऊशे किलोमीटर एवढा प्रचंड असतो. तरीदेखील अचूक लक्ष्यवेध करून मोटरबोट्स आणि त्यांच्या सैन्यावर भारताने मारा केला.
आपले सैन्य एकेक टप्पा पार करत होते. शत्रूचे दिनाजपूरजवळचे रेल्वे मार्शलिंग यार्ड व तेलाचे टॅंकर्स भारताने उद्ध्वस्त केले. कराची-लाहोरदरम्यान असणाऱ्या बहावलपूर रेल्वे जंक्शनवर हल्ला करून तिथला पूल भारताने उद्ध्वस्त केल्याने पाकिस्तानला त्यांचे सैन्य उत्तरेकडे पाठवणे अशक्य केले. पाकिस्तानमधली अनेक गावं ओसाड पडली होती. त्यांच्या लष्करी जाचाला घाबरून बहुतेकांनी भारतामधे आश्रय घेतला होता. मात्र तरीसुद्धा प्रत्येक गावात पाकिस्तानी सैन्य सर्व तयारीनिशी भारतीय सैन्याशी लढत होते. पाक लष्करातील पंजाब रेजिमेंट, रझाकार शर्थीने झुंज देत होते. आपण सुसज्ज होतो, सैनिकांच्या पराक्रमाला तोड नव्हती; मात्र पाकिस्तानी सैन्याची मोर्चेबांधणीही मजबूत होती. तयारी जय्यत होती. पण हळूहळू ठाकूरगाव, खानसामा अशी गावे ताब्यात घेत सैन्य पुढेपुढे
सरकत होते.
ठिकठिकाणी काही युद्धबंदी आपण ताब्यात घेतले. या युद्धात हवाई दलाने अतुलनीय पराक्रम केला. भारतीय सैन्याच्या तीनही दलांमध्ये उत्तम सुसंवाद होता. संयुक्त राष्ट्रसंघाचा भारताला फारसा पाठिंबा नव्हता. जागतिक दबावही होता. तरीही कणखरपणे निर्णय घेऊन आपण मानवतावादी दृष्टिकोन ठेवून पाकिस्तानातील जनतेवरील अत्याचारांना विरोध केला. काही लाख लोकांना शरणार्थी म्हणून स्वीकारले. काहीजणांना सन्मानपूर्वक परत पाठवले. या युद्धात आपल्या काही सैनिकांना पाकिस्तानने युद्धबंदी केले. आपले अनेक सैनिक जखमी झाले, हुतात्मा झाले.
मेघना नदी ओलांडल्यावर ढाका शहर दृष्टिपथात आले. सैदपूर येथे आपले सैन्य असताना पाकिस्तानच्या कमांडिंग अधिकाऱ्याचा शरणागतीचा संदेश घेऊन एक व्यक्ती पोचली. 17 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता सैदपूरच्या झमझम विमानतळावर 23 पाकिस्तानी ब्रिगेडच्या, जवळपास पाच हजार सैनिकांनी शरणागती पत्करली. पश्चिम पाकिस्तानच्या वसाहतवादी जोखडातून बांगलादेश स्वतंत्र झाला. 17 डिसेंबर 1971 या दिवशी सायंकाळी साडेचार वाजता मुक्तीवाहिनी आणि हिंदी लष्कर यांच्या संयुक्त सेनादलापुढे पश्चिम पाकच्या ले. ज. नियाझी यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने बिनशर्त शरणागती पत्करली. या घटनेस यंदा 51 वर्ष पूर्ण होत आहेत. भारताचा हा विजय सुवर्णाक्षरांनी नोंदवण्यासारखाच आहे!





